
विधानसभा निवडणूक २०२४ प्रशिक्षणाद्वारे निवडणुक प्रक्रियेसाठी सुसज्ज होऊ या- किरण कुलकर्णी निवडणूक निर्णय अधिकारी व सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)- निवडणूक प्रक्रियेविषयी देण्यात येणारे प्रशिक्षण आपण आत्मसात करावे. त्यामुळे आपण आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी सुसज्ज होऊ. निवडणुक आयोगाने दिलेल्या सर्व नियमांचा व कार्यपद्धतींचा यथोचित अभ्यासच आपल्याला निवडणूक प्रक्रिया सुलभरित्या पार पाडण्यास सहाय्यभूत ठरेल,असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी व सहा. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या प्रशिक्षणास आजपासून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथील प्रशिक्षण केंद्रावर सुरुवात झाली. एकूण तीन सत्रांमध्ये हे प्रशिक्षण होणार असून पाच दिवसांच्या एका प्रशिक्षण सत्रात १०० अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यातील पहिले सत्र आजपासून सुरु झाले. या सत्राचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी. बीड चे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपायुक्त अनंत गव्हाणे, निवडणूक आयोगाकडून आलेले तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. विजयकुमार वर्मा, डॉ. संजयसिंग बटोनिया, प्रवास जैन, जितेंद्र वर्मा. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी आदी तसेच प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की. प्रशिक्षणातून प्राविण्य प्राप्त करावे व त्यातून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, निवडणूक विषयक प्रशिक्षण हे मन लावून घ्यावे. निवडणूक प्रक्रियेत आता अधिकाधिक डिजीटलायझेशन झाले आहे. त्याचा सराव होणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावरील बारकावे या पाच दिवसीय प्रशिक्षणा दरम्यान दिले जातील, ते आपण आत्मसात करावे,असे आवाहन त्यांनी केले.
श्री, किरण कुलकर्णी म्हणाले की, या प्रशिक्षणानंतर आधिकाऱ्यांचे मुल्यमापन होणार आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक प्रक्रियेचे सविस्तर नियमावली तयार केलेल्या असतात. काय करावे आणि काय करु नये यांच्या कार्यपद्धती दिलेल्या असतात, त्यामुळे प्रत्येक बाबीचा अभ्यास असणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट ही नियमानुसारच होत असते, तसे नियम दिलेले आहेत, त्या प्रत्येक नियमाचा अभ्यास करावा,अशी सुचना त्यांनी दिली.
प्रास्ताविक देवेंद्र कटके यांनी केले. प्रविणा कन्नडकर यांनी सुत्रसंचालन तर प्रविण फुलारी यांनी आभार मानले.
०००००



