रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन व वॊकेथॉन रॅलीचे आयोजन
जालना प्रतिनिधी: रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी जालना येथे गांधी चमन ते मोतीबाग मार्गावर भव्य मॅरेथॉन व वॊकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचे आयोजन उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, नेहरू युवा केंद्र, पोलीस प्रशिक्षण केंद्र, आणि युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
रॅलीचा शुभारंभ उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चंद्रमोहन चित्ताल, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री. अशोक बनकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या रॅलीत विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश लोकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जागृती निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. महात्मा गांधी चौक ते शनी मंदीर चौक मार्गे मोतीबाग येथे रॅली चे समारोप करण्यात आला. मार्गक्रमणादरम्यान विद्यार्थ्यांनी व प्रशिक्षणार्थ्यांनी “सुरक्षित वाहतूक, अपघातमुक्त भारत” आणि “वाहतूक नियम पाळा, जीवन वाचवा” असे संदेश देणारे फलक हातात घेतले होते.
सदरील रॅलीमध्ये सरस्वती भुवन प्रशालेचे विद्यार्थी, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) विद्यार्थी, तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व व रस्ता सुरक्षेची गरज यावर लोकांपर्यंत संदेश पोहोचवला.
रॅलीच्या यशस्वितेसाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहतूक निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. उद्धव थोरवे, आणि युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, तसेच अभिजित भुतेकर व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले
प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या संबोधनात रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. श्री. चित्ताल यांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याची गरज व्यक्त करताना सांगितले, “वाहतूक नियमांचे पालन केल्याने अपघात कमी होतात आणि प्राण वाचू शकतात. आजची ही रॅली रस्ता सुरक्षेबद्दल जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे, वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. राईतवर, आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राचे कर्मचारी, तसेच नेहरू युवा केंद्र आणि NSS टीमचे प्रा. थोरवे यांचे कौतुक करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थी आणि नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
संपूर्ण रॅली दरम्यान सहभागी विद्यार्थी व प्रशिक्षणार्थ्यांनी नागरिकांना रस्ता सुरक्षेबद्दल माहिती दिली. घोषवाक्यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत रस्ता सुरक्षा संदेश पोहोचवला.सुरक्षित वाहतूक आणि अपघातमुक्त भारत घडवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेली मॅरेथॉन व वॊकेथॉन रॅली जालना येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमातून नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश देण्यात यश आले.