कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन विकासासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्याचा निर्धार
कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन,विकासासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्याचा निर्धार..
कोल्हापूर, प्रतिनिधी कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी ‘कोल्हापूर फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत व्यापक विचारमंथन करण्यात आले. शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीसाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली. जिल्ह्यातील विविध १४ नामांकित संघटना एकत्र येत केलेल्या विचारमंथनामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाने विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
कोल्हापूरचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी, कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अबाधित राखून पुढिल पीढीला अपेक्षित कोल्हापूर बनविण्यासाठी ‘कोल्हापूर फर्स्ट’ या उपक्रमाची सुरूवात आज हॉटेल पॅव्हीलीयन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाली.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार शाहू महाराज छत्रपती, प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहूल आवाडे, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अशोकराव माने, अति.जिलहाधिकारी संजय शिंदे, कार्यक्रमाचे समन्वयक सुरेंद्र जैन, ॲड. सर्जेराव खोत यांच्यासह जिल्हयातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध १४ नामांकित संघटना यात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्यू. असोसिएशन, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले, गोकूळ शिरगांव मॅन्यू. असोसिएशन, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, सी.आय.आय.साऊथ महाराष्ट्र, असोसिएशन ऑफ आर्कीटेक्ट अॅन्ड इंजिनिअर्स, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, क्रीडा प्रतिष्ठान, कोल्हापूर, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, क्रीडाई कोल्हापूर, आय.टी. असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आय.आय.एफ. कोल्हापूर चॅप्टर, कोल्हापूर चार्टर्ड अकौंटंट्स सोसायटी यांचा समावेश आहे. यासर्वांनी एकत्रित येत केलेल्या उपक्रमाचे कौतुक सर्वच उपस्थित लोकप्रतिनिधींनी केले. यावेळी विविध विषयांवर बोलण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींना वेगवेगळे विषय देण्यात आले होते.
जनतेच्या हितासाठी जिथे विकास तिथे सर्वांनी एकत्रित या – खासदार, शाहू महाराज छत्रपती
शाश्वत विकासाला प्राधान्य देत जनतेच्या हितासाठी जीथं विकास तिथं सर्वांनी एकत्रित या असे आवाहन खासदार, शाहू महाराज छत्रपती यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. ‘कोल्हापूर फर्स्ट’ उपक्रमाचा मुख्य उद्देश कोल्हापूरचा विकास पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून करणे हा आहे. वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांनी आपल्या सूचनांचा प्रगतीपथ निश्चित करावा. यामध्ये प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्यात यावा असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचाही सहभाग यात करण्याच्या सूचना केल्या.कोल्हापूरच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
उद्योग आणि गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करीत कोल्हापूरच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू अशी ग्वाही पालकमंत्री, प्रकाश आबिटकर यांनी दिली. कोल्हापूर हे ऐतिहासिकदृष्ट्या व्यापार आणि उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी या चर्चासत्रात नमूद केले. कोल्हापूरमधील विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात येणार असून नवीन स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सर्वांनी मिळून ठरविले तर कोल्हापूर फर्स्ट येण्यासाठी वेळ लागणार नाही. विकास आणि पर्यटन या महत्त्वाच्या दोन घटकांना पुढे घेवून जाण्यासाठी रस्ते हा प्रमुख घटक आहे. यासाठी स्थानिक दोन्ही आमदार व खासदार निश्चितच वेगाने निर्णय घेतील. कोल्हापूर मध्ये भौतिक सुविधांची वाढ, शहराची हद्दवाढ होणे आवश्यक असून हद्दवाढ झाली तर आपल्याला अनेक मार्गाने अधिकचा निधी शासनाकडून आणता येईल. पुणे शहराने 27 वेळा हद्दवाढ केली आपण मात्र 1972 पासून एकदाही हद्दवाढ केली नाही. स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांना विश्वासात घेवून हद्दवाढ करण्याची प्रक्रिया राबवावी लागेल असेही ते यावेळी म्हणाले.स्वागतपर भाषणात ॲड.सर्जेराव खोत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे समन्वयक सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्ट उपक्रमाचा उद्देश सांगून संकल्पना मांडली. ते म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पर्यटन सर्कीट तयार करून पर्यटन विकासाला चालना देता येईल. तीर्थक्षेत्र विकासामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. यावेळी कोल्हापूर फर्स्ट लोगोचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. क्षितिजा ताशी यांनी केले तर आभार बाबासो कोंडेकर यांनी मानले. या विचारमंथनातून अनेक उपयुक्त सूचना समोर आल्या असून, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासन, नागरिक आणि खासगी क्षेत्राने एकत्रित प्रयत्न करावेत, असे ठरविण्यात आले. ‘कोल्हापूर फर्स्ट’ उपक्रमामुळे कोल्हापूरचा सर्वांगीण विकास वेगाने होईल आणि भविष्यात ते एक आदर्श शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.