राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना…
ठाणे, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राज्यातील शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरिप हंगाम 2025 च्या आढावा सभेमध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्तापूर्ण उपलब्धतेबाबत राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी संपर्काचा व्हॉट्सॲप क्रमांक: 9822446655 उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक: 18002334000 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. या सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेल वर सुद्धा पाठवता / नोंदवता येईल.संबंधीतांनी, वरील नमूद व्हॉट्सॲप क्रमांक 9822446655, टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक 18002334000 तसेच controlroom.qc.maharashtra@gmail.com य ई-मेलवर येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारी नोंदविताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशिल द्यावा. ही माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठविल्यास सुध्दा आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी नमूद क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन कृषी आयुक्तालय, पुणे 01 चे कृषी संचालक (निवगुनि) सुनिल बोरकर यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी 1 भ्रमणध्वणी, 1 टोल फ्री क्रमांक व 1 ई-मेल तक्रार निवारणासाठी समर्पीत केलेले असून त्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहनही कृषी आयुक्तालय, पुणे 01 चे कृषी संचालक (निवगुनि) सुनिल बोरकर यांनी केले आहे.