चिकू फळपिकविमा नोंदणीसाठीशेवटच्या पाच दिवसांची मुदत..
ठाणे, प्रतिनिधी:- पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना दि.12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षांकरिता राबविण्यात येत आहे. कोकण विभागातील ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये चिकू हे फळपीक मृग बहरासाठी अधिसूचित आहे. चिकू फळपिकासाठी दि.01 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधी दरम्यान जादा आर्द्रता व जादा पाऊस या हवामान धोक्यांकरिता विमा संरक्षण मिळणार आहे.
या योजनेमध्ये एका शेतकऱ्यास मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. कोकण विभागाकरीता प्रति शेतकरी सहभागासाठी एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे (0.10 हे.) व बागेचे वय 5 वर्षे असणे आवश्यक आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र (opt out) योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे.
योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ई- पीक पाहणीद्वारे नोंदलेले क्षेत्र व विमा उतरविलेले क्षेत्र यामध्ये विसंगती आढळल्यास विमा अर्ज रद्द करण्यात येतील व विम्याचा लाभ दिला जाणार नाही. तसेच अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणेही अनिवार्य आहे.ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रिस्टॅक पोर्टलवर नोंदणी करावी.विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./हेक्टर):-ठाणे जिल्हा: फळपिक – चिकू, – विमा संरक्षित रक्कम – 70 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 12 हजार 250/.पालघर जिल्हा: फळपिक – चिकू, – विमा संरक्षित रक्कम – 70 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 3 हजार 500/-.मृग बहार सन 2025 मध्ये योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि.30 जून 2025 आहे. याची कृपया सर्व चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. शेतकऱ्यांनी विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक/ वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी दि.12 जून 2024 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in व कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना कोणतीही शंका असल्यास बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा / तालुका कार्यालय (टोल फ्री क्रमांक: 1800 209 5959) किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग ठाणे-4 बालाजी ताटे यांनी केले आहे.