ज्ञानज्योती व वसतिगृह प्रवेश योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!17 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
ठाणे, प्रतिनिधी :- राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी घटकांतील एकही विद्यार्थी फक्तआर्थिक अडचणींमुळे शिक्षणात मागे पडू नये, हे ध्येय बाळगत राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत “शासकीय वसतिगृह प्रवेश योजना” आणि “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” या योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रवेश व अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट 2025 असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी www.hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी.धुळाज यांनी केली आहे.
या योजनांतर्गत गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना निवास, पोषणयुक्त आहार, शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन या स्वरूपात सहाय्य पुरविले जाते. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारित शिक्षण आणि व्यावसायिक प्रगतीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. अर्जांची छाननी, निवड प्रक्रिया आणि लाभार्थ्यांपर्यंत अचूक अंमलबजावणी यामध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखली जाणार आहे, असेही इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी.धुळाज यांनी सांगितले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात 200 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, ‘ज्ञानज्योतीअंतर्गत 600 लाभार्थी या योजनांद्वारे यंदा प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थिनींसाठी वसतिगृह प्रवेश दिला जाणार आहे. तसेच 600 विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनांचा उद्देश उच्च शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या ग्रामीण, आदिवासी आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना गरजेनुसार आधार देण्यासाठी असल्याचा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी.धुळाज यांनी व्यक्त केला आहे.