जाफ्राबादच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
जालना, प्रतिनिधी): राज्यातील जनतेसाठी राज्य शासन विविध लोककल्याणकारी लोकाभिमूख योजना राबवून गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे. विकासाच्या संकल्पनेत जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक विकासाचे काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. समाजाच्या शेवटच्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन काम करत असून, जाफ्राबादच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी नि: संदिग्ध ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. जाफ्राबाद शहरातील ऐतिहासिक असलेल्या 49 कोटी 43 लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना तसेच 5 कोटी रुपयांचे बसस्थानक बांधकामासाठी आणि 3 कोटी रुपयांची ई-बस चार्जिंग स्टेशन विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार डॉ कल्याण काळे, आमदार संतोष दानवे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, नगराध्यक्ष सुनिता लहाने, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, भास्कर दानवे, बद्री पठाडे, तहसीलदार श्रीमती सारिका भगत आदींची उपस्थिती होती.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा हटविण्यात असून, या नियमामध्ये बदल केल्यामूळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे. त्यासोबतच जनतेला आपल्या मालमत्तेसंदर्भात स्वामित्व मिळावे यादृष्टीने बदल करण्यात आला आहे. तसेच शेत/पाणंद रस्ता हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता मिळावा या उद्देशाने शासनाने 12 फुटांचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे राज्यातील 50 लाखांहून अधिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नगरोथान योजनेअंतर्गत जाफ्राबाद शहरास भूमिगत ड्रेनेज साठी निधी देणार. जाफ्राबाद तालुक्यात खूप चांगले मिरचीची उत्पादन होत आहे. येथील शेतकऱ्यांनी तालुक्यात हरित क्रांती घडवून आणली आहे. हे सरकार राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकासाच्या कामासाठी सर्वांनी एक येणे आवश्यक आहे. विकासाच्या कामामध्ये जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. जलजीवन मिशनकडे आपणास लक्ष द्यावे लागणार आहे. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने जाहीर करतो की लाडकी बहीण योजना नियमित सुरू ठेवून येणाऱ्या काळात वाढीव 2100 रुपये देणार आहोत. घरगुती विजेचे दर वाढत आहे यासाठी मुख्यमंत्री यांनी नियोजन केले आहे. प्रत्येक घरकुलावर 40 हजार रुपयांचे सूर्यघर देणार आहे. तुकडेबंदी कायदा हटविला आहे. प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम करणार असल्याचे श्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार संतोष दानवे यांनी केले. तर यावेळी खासदार डॉ कल्याण काळे, आमदार संतोष दानवे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, नगराध्यक्ष सुनिता लहाने आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नवीन बसस्थानक बांधकाम आणि ई-बस चार्जिंग स्टेशन विकास काम आणि जाफ्राबाद शहरातील पाणी पुरवठा योजनाचे भूमिपूजन सोहळा नियोजित बसस्थानक परिसरात आज पार पडला. यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.