vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुनियोजित व्यवस्थेत 15277 श्रीगणेशमूर्तींसह 1959 गौरींचे भावपूर्ण विसर्जन,कृत्रिम विसर्जन तलावांना उत्तम प्रतिसाद – शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांचा प्रशस्तिपत्राने सन्मान..

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुनियोजित व्यवस्थेत 15277 श्रीगणेशमूर्तींसह 1959 गौरींचे भावपूर्ण विसर्जन,कृत्रिम विसर्जन तलावांना उत्तम प्रतिसाद – शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांचा प्रशस्तिपत्राने सन्मान..

     नवी मुंबई प्रतिनिधी-   दीड व पाचव्या दिवशी व्यवस्थित रितीने पार पडलेल्या विसर्जन सोहळ्याप्रमाणेच सातव्या दिवशी गौरींसह होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळाही अत्यंत भावपूर्ण वातावरणात 22 नैसर्गिक आणि 143 कृत्रिम विसर्जन तलावांवर नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या सुनियोजित व्यवस्थेमध्ये निर्विघ्नपणे संपन्न झाला. महानगरपालिका क्षेत्रात सातव्या दिवशीच्या विसर्जन सोहळयात 15277 श्रीगणेशमूर्तींचे व 1959 गौरींचे विसर्जन करण्यात आले. सर्वच ठिकाणी महानगरपालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे तसेच सुसज्ज पोलीस यंत्रणेमुळे सर्व ठिकाणचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडले.

          महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांनी ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सातव्या दिवशी 3609 शाडूच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करुन नागरिकांनी पर्यावरणाविषयी जागरुकता दाखविली. शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापना करणाऱ्या विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना महापालिका आयुक्त यांच्या स्वाक्षरीचे स्वच्छता व पर्यावरणमित्र प्रशस्तिपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. प्रशस्तिपत्राच्या माध्यमातून नागरिकांचे पर्यावरण जपणूकीबद्दल कौतुक करुन इतरही नागरिकांना त्यादृष्टीने प्रोत्साहित करण्याच्या संकल्पनेचे नागरिकांनी स्वागत केले.

          उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फूटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमुर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. महानगरपालिकेने संपूर्ण क्षेत्रात 143 इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 11235 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करुन पर्यावरणप्रेमी नागरिकांनी नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण करण्याचा दृष्टीकोन जपला. कृत्रिम विसर्जन तलावांमुळे घरापासून जवळ शांततेत मनोभावे विसर्जन करता येते अशी भावनाही अनेक नागरिकांनी व्यक्त केली. 6 फूटापेक्षा उंच मूर्तींचे नैसर्गिंक जलाशयांमध्ये विसर्जन करण्यात आले.

          नमुंमपा क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 3860 घरगुती तसेच 182 सार्वजनिक मंडळांच्या 4042 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 143 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 11207 घरगुती तसेच 28 सार्वजनिक मंडळांच्या 11235 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 15067 घरगुती व 210 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 15277 श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 3609 श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. तसेच 1959 गौरी विसर्जन करण्यात आले.

          यामध्ये बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 46 घरगुती व 24 सार्वजनिक तसेच 22 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1515 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

          नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 805 घरगुती व 39 सार्वजनिक तसेच 26 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1420 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

          वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 790 घरगुती व 14 सार्वजनिक तसेच 16 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 292 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

          तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 838 घरगुती व 27 सार्वजनिक तसेच 21 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 902 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन झाले.

          कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 660 घरगुती व 24 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 2339 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

           घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 602 घरगुती व 47 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 2856 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

          ऐरोली विभागात 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1203 घरगुती व 12 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

          दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 119 घरगुती व 7 सार्वजनिक तसेच 11 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 680 घरगुती व 15 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

          अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 165 विसर्जन स्थळांवर 1959 गौरींसह 17236 श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.

          गौरींसह होणारे श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन मोठया संख्येने होत असल्याने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेची विसर्जन यंत्रणा तसेच पोलीस दक्षतेने कार्यरत होते. मुख्य विसर्जन स्थळांवर मोठया आकाराच्या मूर्तींसाठी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच पुरेशी विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था होती. त्याठिकाणी नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात होती व विसर्जन व्यवस्थित रितीने व्हावे याकरिता आवश्यक संख्येने स्वयंसेवक व लाईफगार्ड्स विभाग कार्यालयांच्या वतीने कार्यरत होते. यासोबत नमुंमपा अग्निशमन दलाचे जवानही सुरक्षेच्या दृष्टीने कार्यरत होते. कृत्रिम विसर्जन स्थळांवरही सुयोग्य व्यवस्था होती. महानगरपालिकेने गर्दीचे विभाजन व्हावे या अनुषंगाने केलेली विसर्जन व्यवस्था व 143 इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेले कृत्रिम तलाव याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

          स्वच्छ शहर म्हणून असलेला नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक जपण्यासाठी सर्व विसर्जन स्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत. येथील निर्माल्य सातत्याने निर्माल्य संकलन वाहनांव्दारे उचलून नेले जात असून तुर्भे येथील प्रकल्पस्थळी निर्माल्याचे पावित्र्य राखून स्वतंत्र संकलन करण्याची व योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सातव्या विसर्जन दिवशी संकलीत झालेल 24 टन 440 किलो निर्माल्य स्वतंत्र वाहनांनी वाहून नेण्यात आले.

           नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव साजरा करण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणे तसेच कृत्रिम तलावात श्रीमूर्ती विसर्जन करणे अशा पर्यावरणपूरक वर्तनाचा अंगिकार केला आहे. अशाच प्रकारचे सहकार्य यापुढील अनंत चतुर्दशी होणा-या विसर्जन काळातही राखावे व पर्यावरणशील दृष्टीकोन जपत आपल्या गणेशमूर्तींचे घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा नागेवाडी जालना या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव..

गुणवत्ता आणि मुदतीबाबत तडजोड खपवून घेणार नाही*प्रलंबित रस्ते कामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम यंत्रणांना कडक इशारा …

vishwatmaklokswamivarta

बारमाही पाणी व्यवस्थापनासाठी झऱ्यांचे पुनरुजीवन, संवर्धन आवश्यक,मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील 

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटमजी यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन..

सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम – शहराच्या अंतर्गत भागातही मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता..

कृषीआधारीत प्रशिक्षणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर. आणि अमरावती विभागातील बातम्या…