नमुंमपा जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नामांकित जलतरणपटू श्री शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती..
नमुंमपा जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नामांकित जलतरणपटू श्री शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती..
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई शहरातून उत्तम जलतरणपटू घडावेत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव उपलब्ध् करुन दिला असून या माध्यमातून नवी मुंबईतील जलतरणपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रम नोंदविण्याची कामगिरी करावी अशा शुभेच्छा देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सर्वच खेळांमध्ये उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्याची बांधिलकी जपत काम करीत असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा परिषद यांचे सहकार्याने आयोजित ‘नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय “जलतरण” स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी आयुक्तांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त श्री. सुखदेव येडवे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकारचा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिध्द सागरी जलतरणपटू व स्वच्छ नवी मुंबई मिशनचे युथ आयकॉन श्री. शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा जलतरण असोसिएशनचे सचिव श्री. कैलास आखाडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू श्री. गोकुळ कामथ आणि नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन समिती सदस्य श्री.धनंजय वनमाळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा व्यापक प्रचार व प्रसारही करण्यात आला. या स्पर्धेमध्ये महापालिका क्षेत्रातील खाजगी व महानगरपालिकेच्या 31 शाळांमधील 200 हून अधिक जलतरणपटूंनी सहभाग घेतला आहे. विविध वयोगटांच्या व अंतराच्या या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठया प्रमाणावर उत्साही उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधतांना जलतरणपटू श्री. शुभम वनमाळी यांनी सागरी जलतरणाचे अनुभव कथन केले. आता समुद्रात जलतरण करतांना वाढते तापमान व समुद्रातील कचरा याची अडचण जाणवते याचा उल्लेख करीत कोणीही समुद्र किंवा जलाशयात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिका खेळाडूंसाठी मोठया प्रमाणावर काम करीत असून मिळालेल्या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ जलतरणपटू व सर्वंच खेळांमधील क्रीडापटूंनी करुन घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित खेळाडू विद्यार्थ्यांना केले. सध्या स्वच्छता ही सेवा अभियान सुरु असून त्यातही सक्रीय सहभागी होउून स्वच्छते विषयी व नवी मुंबई शहराविषयी बांधिलकी जपावी असेही ते म्हणाले.
क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांनी 4 सप्टेंबर पासून नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असल्याचे सांगत यावर्षी 48 खेळांच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला असल्याची माहिती दिली. तसेच जलतरण स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या.