नेरुळ येथे छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण जल्लोशात संपन्न,आरोग्यसेवा सक्षम करणा-या नेरुळ रुग्णालयातील अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळेचा शुभारंभ…
नेरुळ येथे छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण जल्लोशात संपन्न,आरोग्यसेवा सक्षम करणा-या नेरुळ रुग्णालयातील अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळेचा शुभारंभ…
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने से.1 नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण तसेच से.15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात मायक्रोबायलॉजी प्रयोग शाळेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, माजी खासदार डॉ.संजीव नाईक, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, माजी महापौर श्री.जयवंत सुतार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यासाठी रायगडावर पूजा करणारे पुजारी श्री. कृष्णा पाटील, श्री. ज्ञानेश्वर लोहार, श्री.अनंत केरेमणी उपस्थित होते. संपूर्ण चौक शिवभक्तांच्या गर्दीने फुलून आला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी – जय शिवाजी’ अशा ललका-यांनी नागरिक शिवप्रभूंच्या नावाचा गजर करीत होते.
नेरुळ से.1 येथे राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रचलीत असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून सातत्याने होत होती. त्यास अनुसरुन या चौकामध्ये असलेल्या घुमटाकार मेघडंबरीखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ब्रॉन्झ धातूच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिंहासनासह 12 फूट उंच व 2.5 टन वजनाचा असलेल्या या प्रेरणादायी पुतळ्याच्या भोवती ऐतिहासिक वातावरण निर्मितीसाठी सभोवतालच्या क्षेत्राचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याठिकाणी 4 भाला धरलेले मावळे आणि तोफांसहित 3 मावळे यांच्या शिल्पाकृती उभारण्यात आल्या आहेत. शिल्पसृष्टी कला प्रतिष्ठानचे प्रमुख शिल्पकार प्रा. मोरेश्वर पवार यांनी पुतळ्याची निर्मिती केली आहे. पुतळा स्थापनेसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय परवानग्या प्राप्त आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन नवचैतन्य निर्माण करण्यासाठी व इतिहासाविषयी ज्वलंत अभिमान जागृत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा से.1 नेरुळ येथील चौकातील सिंहासनारुढ पुतळा प्रेरणादायी ठरणार आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयामध्ये दुस-या मजल्यावर अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळा स्थापित करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा उभारणीसाठी मे. आदित्य बिर्ला फाऊंडेशन यांच्यामार्फत प्राईड इंडिया संस्थेच्या सहयोगाने रु.80 लक्ष इतका सीएसआर निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून ही प्रयोगशाळा रुग्णांच्या क्लिनिकल व्यवस्थापनात आणि साथरोगाच्या अभ्यासात अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
मायक्रोबायलॉजी लॅबमुळे रोगास कारणीभूत ठरणा-या जीवाणू, विषाणू, बुरशी, परजीवी यासारख्या सूक्ष्म जीवांची ओळख केली जाऊन संसर्गजन्य रोगाचे अचूक निदान केले जाते व योग्य प्रतिजैविक उपचार सुरू करणे शक्य होते. तसेच रोगाचे लवकर निदान करणे आणि त्याचा प्रसार थांबविणे शक्य होते. त्यामुळे विशेषत्वाने साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्याकरिता मायक्रोबायलॉजी लॅब महत्वाची ठरते. पीजीआयएमएस च्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिजैविके सुरू करण्यापूर्वी कल्चर सेंसिटिविटी टेस्ट्स करणे आवश्यक असते, तसेच इन्फेक्शन कंट्रोल कमिटीच्या च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कल्चर स्वॅब टेस्ट करणे शक्य होते.
याठिकाणी ब्लड कल्चर एंड सेंसिटिविटी टेस्ट्स, बॉडी फ्लुइड कल्चर अँड सेंसिटिविटी टेस्ट्स, स्पुटम कल्चर एंड सेंसिटिविटी टेस्ट्स, यूरिन कल्चर अँड सेंसिटिविटी टेस्ट्स, स्टूल कल्चर अँड सेंसिटिविटी टेस्ट्स, पस स्वॅब कल्चर सेंसिटिविटी टेस्ट्स, फंगल कल्चर, आरटी-पीसीआर टेस्ट्स फॉर कोविड अँड स्वाइन फ्लू, एलिसा टेस्ट फॉर एचआयव्ही, एचसीव्ही, एचबीएसएजी आदी विविध महत्वाच्या चाचण्या केल्या जातात. यावेळी मंत्रीमहोदयांसह मान्यवरांनी केमोथेरपी वॉर्ड तसेच कॅन्सर रजिस्ट्री व तपासणी विभागाचीही पाहणी केली. नवी मुंबईकरांच्या आरोग्य रक्षणासाठी महानगरपालिकेच्या वतीने सुरू केल्या जाणा-या आधुनिक आरोग्य सुविधांची मंत्रीमहोदयांनी प्रशंसा केली.
अशाप्रकारे नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम व गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक करणारी मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळा यासारख्या सुविधेचा शुभारंभ संपन्न होत असतांना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.