
जन आरोग्य योजना सर्वांसाठीच ठरणार जीवनदायी
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दरवर्षी पाच लाखा रुपये पर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती महसूल आणि नगरपरिषदासह सर्वत्र सर्वच यंत्रणांनी आयुष्यमान कार्ड काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यभरातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना आहे. त्यानुसार तातडीने कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करणे बाबत आरोग्य विभागाला निर्देश मिळाले आहेत. त्यासाठी ऑनलाईन अथवा कैम्प लावून प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना आहेत.
योजनांमध्ये या आजारावर होणार मोफत उपचार या आरोग्य योजनेअंतर्गत गंभीर ते सामान्य अशा 1 हजार 300 हून अधिक प्रकारच्या आजारावर आणि शस्त्रक्रियांचा उपचाराचा समावेश आहे. यात हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड प्रत्यारोपण, गुडघा बदलणे अशा मोठ्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या मोठ्या आजारावर सहज उपचार करता येणार आहे. त्यात होणारा आर्थिक खर्च टाळता येणार आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लाभ,राज्यातील महसूल, नगरपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठीचा मोठा खर्च टाळता येणार आहे. एकत्रित योजनेमुळे या कर्मचाऱ्यांना 5 लाख रुपयांच्या आरोग्य खर्चाची चिंता मिटणार आहे. यासाठी कर्मचारी राज्यातील रहिवासी असावा लागणार आहे यासोबतच त्यांच्याकडे रेशनकार्ड असणे आवश्यक आहे.
आता बिलाची चिंता मिटली,कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोठ्या आणि गंभीर आजारावर उपचार करताना येणाऱ्या हॉस्पिटल बिलाची चिंता मिटणार आहे. 5 लाखापर्यंतचा उपचार खर्च पूर्णपणे सरकार उचलणार आहे. त्यामुळे रुग्णावर उपचार करण्यासाठी कर्ज काढण्याची अथवा आर्थिक तडजोड करण्याची वेळ येणार नाही. आरोग्य विभागाच्या नव्या निर्णयाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मिळाला दिलासा,मोठा संघर्ष करूनही आरोग्य विम्यापासून वंचित राहिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आता महत्वाचा ठरला आहे. या योजनेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या गरजेच्या वेळी मोठ्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातून त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार मिळणार आहे. हे योजना कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे.
आयुष्यमान भारतकार्ड काढण्याच्या सूचना
योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कर्मचारी व त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्यमान कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे या सरकारी यंत्रणाना शिबिर घेऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने लवकरात लवकर आपली कार्ड तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांनी दिल्या आहेत.
०००००००



