
खाजगी पीआर एजन्सीवर लाखो रुपयांची उधळपट्टी,MMRDA’ चा प्रसिद्धीवर महिन्याला 21 लाख 70 हजारांचा खर्च; ऑडिटची मागणी…
मुंबई : प्रतिनिधी : कोरोना काळात शासकीय आणि अन्य प्राधिकरणाच्या कामाचा वेग मंदावला असताना एमएमआरडीए (MMRDA) प्राधिकरणाने एका खाजगी पीआर एजन्सीवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे. प्राधिकरणाचा जनसंपर्क विभाग असतानाही खाजगी कंपनीला प्रत्येक महिन्याला 21 लाख 70 हजार रुपयांचे वाटप केले आहे. तर मागील 2 वर्षात पीआर एजन्सीला 5 कोटी 21 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीए प्राधिकरणाने माहिती अधिकाऱ्याच्या उत्तरात दिली आहे. या प्रकरणाचे ऑडिट करण्याची मागणी होत आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्राधिकरणाकडे खाजगी पीआर एजन्सीची माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्राधिकरणाने त्यांना कळविले की महानगर आयुक्त आर ए राजीव यांच्या मान्यतेने मे. मर्कटाईल अॅडव्हरटायझिंग या पीआर एजन्सीची नेमणूक 15 जुलै 2019 पासून केलेली आहे. मागील 2 वर्षात एमएमआरडीए प्राधिकरणाने या एजन्सीला तब्बल 5 कोटी 21 लाख रुपये प्रसिद्धीसाठी दिले. मागील 2 वर्षात दिलेली रक्कम लक्षात घेता प्रत्येक महिन्याला सरासरी 21 लाख 70 हजार एमएमआरडीएने दिले आहेत.विशेष म्हणजे जेव्हा मुंबई सहित महाराष्ट्रात संपूर्णपणे लॉकडाउन होता तेव्हा पीआर एजन्सीला त्या दरम्यान लाखों रुपये डोळे बंद करून देण्यात आले. एमएमआरडीए प्राधिकरणात स्वतंत्र जनसंपर्क खाते असून 2 अधिकारी वर्गावर प्रत्येक महिन्याला एमएमआरडीए प्राधिकरण 1 लाख 50 हजार रुपये खर्च करते. तसेच करार पद्धतीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर 25 हजार रुपये खर्च करते. उलट जनसंपर्क खात्याला गतिमान करत एमएमआरडीए प्राधिकरण सहजपणे कोट्यवधी रुपयांची बचत करू शकली असती.



