नवी मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरू,मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटीस बजावून जप्तीची कारवाई करा – आयुक्त डॉ. कैलास शिंदे
नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर विभागाने थकबाकीदारांविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी व संबंधितांना नोटीस बजावून ३१ मार्च २०२६ पर्यंत कर न भरल्यास त्यांच्या मालमत्ता नियमानुसार जप्त करून त्यांची लिलाव प्रक्रिया सुरू करावी, असे स्पष्ट निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेताना दिले. बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता थकबाकीदारांवर प्रामुख्याने जप्तीची व लिलावाची कारवाई करण्यात यावी असे देखील आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची मालमत्ता कर वसूली संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसूलीस गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अद्यापही काही मालमत्ताधारकांनी कर भरलेला नसल्याचे निदर्शनास आले असून, अशा थकबाकीदारांविरोधात जप्तीची कारवाई करून त्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार विहित मुदतीची नोटीस दिल्यानंतरही ३१ मार्च २०२६ पर्यंत कर न भरल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई करून त्याची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
महत्वाचे म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी १० मार्च २०२६ रोजी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शुल्कावर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी निर्दिष्ट कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक असून, या योजनेची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी, रात्री १२.00 वाजेपर्यंत आहे. याशिवाय महानगरपालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जप्तीची व लिलावाची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तात्काळ मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.असा भरा ऑनलाइन कर
नवी मुंबई शहरातील मालमत्ताधारकांसाठी आठही विभाग कार्यालयांमध्ये कर संकलन केंद्रांत प्रत्यक्ष कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून, त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीनेही मालमत्ता कर भरण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंतचा मालमत्ता कर भरण्यासाठी केवळ ८ दिवसांची म्हणजेच ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत राहिली आहे. तरी अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही, त्यांनी महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन किंवा WhatsApp Chatbot – 8291920504 द्वारे किंवा कर संकलन केंद्रात प्रत्यक्ष जाऊन आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. साडे तीन हजार थकबाकीदारांना बजावली नोटीस; लिलावाची प्रक्रिया करणार सुरू
वारंवार कसुरदार अशा ३ हजार ६४२ थकबाकीदारांना महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने ७ दिवस / ४८ तासाची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नोटीस दिल्यानंतर देखील मालमत्ता कर न भरलेल्या मालमत्ता जप्त करून त्या मालमत्तांची लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही, त्यांनी जप्ती व लिलावाची कठोर कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.