
केटरिंग व्यावसायिकांमध्ये जनजागृती;अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील केटरिंग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चीज ॲनालॉग व पनीर यांच्या वापराबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
अत्र व औषध प्रशासनाचे आयुक्त् श्रीधर डुबेपाटील यांनी चीज अॅनालॉग व पनीर वापराबददल अन्न व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्याबाबत परिपत्रकाद्वारे सूचित केले होते. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील केटरींग व्यावसायिकांची सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील यांनी आज बैठक घेऊन त्यांना माहिती दिली. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, अंतर्गत असलेल्या तरतुदीबाबत माहिती दिली. तसेच अन्न सुरक्षततेसाठी सुचना दिल्या.
त्यांनी मार्गदर्शन केले की, कच्चे अन्न अनपदार्थ हे परवानाधारकांकडुन खरेदी करावे व त्याचे पक्के खरेदी बिल घ्यावे.ज्या ठिकाणी अनपदार्थ तयार करतात ती जागा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ असावी.अन्न पदार्थ तयार करत असतांना दर्जेदार कच्चे अन्न पदार्थ वापरावेत. पदार्थात चीज अॅनालॉगचा वापर करीत असल्यास त्याबददल ग्राहकांना तसे मेन्युकार्ड वर अथवा ऑर्डर घेतांना अवगत करावे.अन्न पदार्थ तयार करतांना वापरण्यात येणारे पाणी हे पिण्यायोग्य आहे त्याबाबतचा विश्लेषण अहवाल असावा.अन्न हाताळणेबाबतचे प्रशिक्षण घेतलेला कर्मचारी वर्ग असावा. अन्न हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डोक्याला टोपी व अॅप्रॉन देण्यात यावे.अन्न साठवण्यासाठीची भांडी ही स्टीलची व स्वच्छ असावी.अन्न वाहतुक करतांना वापरण्यात येणाऱ्या वाहनांना अन्न परवाना घेणे गरजेचे आहे. तयार अन्न पदार्थामध्ये कायद्याने बंदी असलेला कुठलाही घटक पदार्थ वापरु नये.
केटरिंग असोसिएशनच्या वतीने प्रकाश देशपांडे, हितेंद्रसिंग ठाकुर, राजु सोनोने, कैलारा रोडे, सुनील विष्ध, प्रशांत मुरकुटे व अन्य ५० केटरींग व्यावसायिक हजर होते. तसेच प्रशासनाच्या वतीने सहायक आयुक्त विवेक पाटील अन्न सुरक्षा अधिकारी, श्रीमती वर्षा रोडे उपस्थित होत्या.
०००००



