जालना जिल्ह्यातील 65 कोतवाल व पोलीस पाटील “आपदा मित्र” प्रशिक्षणासाठी कोलाडकडे रवाना
जालना, प्रतिनिधी- नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या काळात गावपातळीवर तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्यातील 65 कोतवाल व पोलीस पाटील यांना “आपदा मित्र” योजनेअंतर्गत विशेष निवासी प्रशिक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे रवाना करण्यात आले आहे. ही योजना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) अंतर्गत राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
गावपातळीवरील प्रशासनात कोतवाल व पोलीस पाटील हे अत्यंत महत्त्वाचे घटक असून आपत्तीच्या वेळी नागरिकांपर्यंत सर्वप्रथम पोहोचणारे प्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका निर्णायक ठरते. याच पार्श्वभूमीवर त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे सखोल व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणामध्ये पूरस्थितीतील बचावकार्य, सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन, जल बचाव (Water Rescue), दोरीच्या साहाय्याने बचावकार्य (Rope Rescue), अग्निशमन तंत्र, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, प्राथमिक उपचार, सीपीआर (CPR), जखमी व्यक्तींची सुरक्षित हाताळणी, स्थलांतर प्रक्रिया (Evacuation), तसेच आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीतील समन्वय आणि आपत्तीनंतर पुनर्वसन या विषयांचा समावेश आहे.
कोलाड येथील राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण होणार असून प्रत्यक्ष आपत्तीजन्य परिस्थितीचे अनुकरण (Mock Drills व Simulations) करून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात आपत्तीच्या प्रसंगी अधिक वेगाने, शिस्तबद्ध आणि प्रभावी प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून या प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये जालना (08), बदनापूर (04), भोकरदन (06), जाफ्राबाद (06), परतूर (07), मंठा (03), अंबड (19) आणि घनसावंगी (12) अशा एकूण 65 प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षित कोतवाल व पोलीस पाटील यांचा जिल्हा आपत्ती प्रतिसाद यंत्रणेत आवश्यकतेनुसार उपयोग करण्यात येणार असून ग्रामस्तरावर आपत्ती सज्जता निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर तसेच नायब तहसीलदार निलम लुणावत यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देऊन हिरवी झेंडी दाखवत त्यांना प्रशिक्षणासाठी रवाना केले.