vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; मुंबई शहर व्हिएतनाम करिता पर्यटनाचे ‘गेट वे’ झाले असल्याची राष्ट्राध्यक्षांची भावना*  

*व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; मुंबई शहर व्हिएतनाम करिता पर्यटनाचे ‘गेट वे’ झाले असल्याची राष्ट्राध्यक्षांची भावना*

राज्य प्रतिनिधी-गेल्या काही वर्षात भारतातून व्हिएतनामला येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली असून पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई हे शहर व्हिएतनाम करिता ‘गेट वे’ सिद्ध झाले असल्याचे प्रतिपादन व्हिएतनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष व महासचिव तो लम यांनी आज येथे केले.

राष्ट्राध्यक्ष तो लम तसेच त्यांचेसोबत भारतभेटीवर आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ गुरुवारी (दि. ७ मे) राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे स्वागत समारंभ व स्नेह भोजनाचे आयोजन केले, त्यावेळी ते बोलत होते.

स्वागत समारोहाला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांसह व्हिएतनाम देशाचे तसेच राज्याचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

आगामी काळात भारताशी ऑटोमोबाईल, विज्ञान, तंत्रज्ञान, स्टार्टअप व इन्क्युबेशन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास व्हिएतनाम उत्सुक असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लम यांनी यावेळी सांगितले.

पुणे हे शहर पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते तसेच स्वयंचलित वाहन निर्मितीसाठी देखील प्रसिद्ध असल्याचे नमूद करून व्हिएतनाम स्वयंचलित वाहन क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत आणि व्हिएतनाम इतिहास, संस्कृती, धर्म व परस्पर विश्वासाने परस्परांशी बांधले असून उभय देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवले जाईल असे त्यांनी सांगितले. आज दुपारी आपण नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला भेट दिली व भारताची आर्थिक क्षेत्रातील घोडदौड पाहून थक्क झालो असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लम यांनी राज्यपालांना सांगितले.

मुंबई व हो चि मिन्ह शहर या महानगरांमध्ये बरीच साम्यस्थळे असून दोन्ही शहरे आपल्या देशांकरिता आर्थिक राजधानी व चित्रपट निर्मितीची केंद्रे आहेत. उभय शहरांमधील भगिनी शहर सहकार्य यानंतर अधिक वाढवले जाईल असे राष्ट्राध्यक्षांनी यावेळी सांगितले

भारत आणि व्हिएतनाम देशांमध्ये माहिती तंत्रज्ञान, व्यापार यांसह अनेक क्षेत्रात सहकार्य करार झाल्याचे समजून आनंद झाला. महाराष्ट्रात अजंता, वेरुळ व घारापुरी लेण्यांसहित बौद्ध धर्मासंबंधी अनेक स्थळे असून व्हिएतनामला पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने खूप वाव असल्याचे राज्यपालांनी सांगितले. मुंबई व हो चि मिन्ह मध्ये व्यापार वृद्धीच्या दृष्टीने दरवर्षी शिखर परिषद आयोजित केली जावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई ही चित्रपट क्षेत्राची देखील राजधानी आहे व अनेक भारतीय चित्रपटांचे चित्रीकरण व्हिएतनाम येथे झाल्याचे नमूद करुन उभय देशांनी संयुक्त चित्रपट निर्मिती करावी असे आवाहन राज्यपालांनी केले.

सन १९५८ साली व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो चि मिन्ह हे मुंबईला आले होते व त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत याच लोकभवनात करण्यात आले होते असे सांगून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राष्ट्राध्यक्षांना हो चि मिन्ह यांच्या लोकभवनात झालेल्या त्या ऐतिहासिक भेटीच्या छायाचित्राची फोटो फ्रेम भेट दिली.

राष्ट्राध्यक्ष तो लम यांची भारत भेट देखील त्या भेटीप्रमाणे ऐतिहासिक सिद्ध होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

स्वागत समारोहाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईच्या महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त देवेन भरती व इतर मान्यवर देखील उपस्थित होते.

पॉलिटब्यूरोचे सदस्य असलेले व्हिएतनामचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री, सार्वजनिक सुरक्षा मंत्री, परराष्ट्र मंत्री, वित्त मंत्री, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री, आरोग्य मंत्री व उद्योग व्यापार मंत्री हे देखील स्वागत समारंभाला उपस्थित होते.

 

**

संबंधित पोस्ट

मान्सूनमधील आपत्तीत एकही मृत्यू होऊ नये- जिल्हाधिकारी सौरभ कटियार*मान्सूनपूर्व उपाययोजनांचा आढावा

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांकडून भक्तिरसपूर्ण गायन व नृत्यवंदना !भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक भाविकांनी या महोत्सवाला उपस्थिती

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास,वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण

नवी मुंबईत प्रदूषणकारी 19 बांधकामे बंद – 42 बांधकामांना नोटीसा समीर ॲप व प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या वेबसाईटवरुन हवा गुणवत्ता विषयक अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन

राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागांतील हजारो हॉटेल व्यावसायिकांचा कर वाढीविरोधात संप…

सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी महत्वाकांक्षी सायबर सुरक्षा प्रकल्प- गृह राज्यमंत्री योगेश कदम