vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस- मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत देणार- जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन करणार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस- मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत देणार- जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन करणार

 सांगली, प्रतिनिधी: जत तालुक्यातील मोटेवाडी दुर्घटनेतील जखमी रूग्णांपैकी 4 रूग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे उपचारासाठी दाखल असून, या रूग्णांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली. तसेच, शासन त्यांच्या पाठीशी आहे, अशा शब्दात त्यांना धीर दिला. महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाख रूपये मदत देण्यासाठी पाठपुरावा करू व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाईल, असा दिलासा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.

मोटेवाडी येथे दिनांक 12 मे 2026 रोजी अवकाळी पावसामुळे मंदिराशेजारील पत्र्याचा शेड उडून भिंतीवर धडकल्याने भिंत कोसळून मरगुबाई यात्रेनिमित्त आलेल्या 6 भाविकांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्घटनेबाबत खंत व्यक्त करत तातडीने घटनेची माहिती घेऊन जखमींना धीर दिला व ते लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथील भेटप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रूपेश शिंदे आदि उपस्थित होते.

 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केला असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हा प्रस्ताव उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मांडू. मदत व पुनर्वसन मंत्र्यांशी बोलून लवकरात लवकर मृतांच्या वारसांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करू. जखमींच्या उपचारांचाही सर्व खर्च शासनामार्फत केला जाईल. यासंदर्भात आवश्यक ती सर्व मदत देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.  जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जखमी रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेत मृत व्यक्तिंच्या वारसांना शासनाकडून अनुदान देण्यासाठी प्रस्ताव तयार केला असून तो आज शासनास पाठविण्यात येईल. घटनास्थळी तात्काळ महसूल व पोलीस यंत्रणेने जाऊन आवश्यक सर्व कार्यवाही केली असल्याचे त्यांनी सांगितले.

जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवस्थानच्या यात्रेला कर्नाटक-महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. दि. 12 मे रोजी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे भाविक संरक्षणासाठी भिंतीजवळ आडोशाला गेले. मात्र मंदिराशेजारील पत्र्याचा शेड उडून भिंतीवर आदळल्याने तीच भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांपैकी 3 जण जत तालुक्यातील आहेत, तर 3 जण कर्नाटकचे आहेत. मृत व्यक्तींमध्ये 4 पुरुष आणि 2 महिला (पुरुषांमध्ये दोन 15 ते 16 वयोगटातील मुले आहेत). एकूण 13 जण जखमी असून त्यांच्यावर मिरज मेडिकल कॉलेज, सांगली, सिनर्जी हॉस्पिटल, सांगली, जत, संख आणि विजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे दिमाखदार आयोजन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना-शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी व्हर्जन 2.00 कार्यान्वित

vishwatmaklokswamivarta

श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्यासर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कोलकाता पोलीस उपायुक्त शंतनू सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी; ईडीची मोठी कारवाई 🇮🇳⚖️🔍 

कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार