मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा-मंत्री डॉ. अशोक उईके
अमरावती, प्रतिनिधी: चिखलदरा आणि धारणी हे आदिवासी बहूल तालुके दत्तक घेतलेले आहेत. त्यामुळे या भागाच्या विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मुलभूत समस्या दूर करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय ठेवावा. यामुळेच त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले.
मंत्री डॉ. उईके यांच्या अध्यक्षतेखाली धारणी येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत कुपोषण, सिकलसेल, थॅलेसेमिया आणि क्षयरोग या गंभीर विषयांवर स्वतंत्रपणेचर्चा करण्यात आली. आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि उपचार सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या क्षेत्रातील सिकलसेल आणि कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कुपोषणमुक्तीसाठी पावसाळ्यापूर्वी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
मंत्री डॉ. उईके यांनी, आदिवासी क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने कार्य करणे गरजेचे आहे. शासनाची कामे प्रत्यक्षात दिसली पाहिजेत. त्यासोबतच नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच योजनांच्या लाभासाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थ्यांची यादी अनिवार्यपणे लावण्यात यावी.
बिरसा मुंडा कृषी योजनेत शेतकऱ्यांना विहिरीसोबतच सोलार सिस्टीम, पाईपलाईन, स्प्रिंकलर आणि मोटार पंपही देण्यात यावेत. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळू शकेल. कृषी विद्यालयातील रिक्त पदे आणि इमारतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. शासकीय आश्रम शाळांतील सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. खारी आश्रमशाळा येथे वीज कनेक्शन आणि कमी दाबाच्या विजेची समस्या जाणवत आहे. याबाबत आश्रमशाळा आणि वसतिगृहांना स्वतंत्र डीपी बसविण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले. तसेच तारूबांदा गावात वाढीव वीज पोल तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
रायपूर येथील आश्रमशाळेला जाण्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासकीय मान्यता देऊन रस्ता मंजूर करण्यात यावा. १५ जूनपूर्वी सर्व आश्रमशाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच प्रत्येक गावात स्मशानभूमी आणि त्यासाठी पक्का जोडरस्ता तयार करण्यात यावा, असेही डॉ. उईके यांनी सूचविले.
यावेळी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनिल चौथमल, आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, आरोग्य उपसंचालक तसंगतुषार वारे, रमेश मावसकर उपस्थित होते. बैठकीपूर्वी डॉ. उईके यांचे धारणी येथील विश्रामगृह येथे आदिवासी परंपरेनुसार गदली सुसुन नृत्याने स्वागत करण्यात आले. तत्पुर्वी डॉ. उईके यांनी सकाळी तारूबांदा येथील कांद्रीबाबा हनुमान मंदिर भेट दिली.