vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक१२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार…

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक१२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार…

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी तत्काळ भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे महामंडळावर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10.87 लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. सध्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत डिझेलचा पुरवठा केला जात असून, मागील आठवड्यात प्रति लिटर 88.21 रुपये असलेला दर आता वाढून 91.31 रुपये झाला आहे. त्यामुळे प्रति लिटर 3 रुपये 10 पैशांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

या दरवाढीमुळे महामंडळाला दररोज अंदाजे 33 लाख 70 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असून, मासिक स्तरावर हा भार सुमारे 10 कोटी रुपये, तर वार्षिक स्तरावर सुमारे 124 कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असून, एप्रिल 2026 मध्ये महामंडळाला सुमारे 76 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. वाढत्या इंधन खर्चाचा थेट परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होत असून, भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे आवश्यक ठरू शकते.

तथापि, कोणतीही भाडेवाढ तातडीने लागू करण्यात येणार नसून, केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली इंधन दरवाढीच्या अनुषंगाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. संबंधित प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा यासाठी शासन विविध पर्यायांचा विचार करीत असून, इंधन बचत, ई-बसचा वाढता वापर, खर्च नियंत्रण तसेच महसूलवाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा असून, सेवा अबाधित राखत आर्थिक संतुलन कायम ठेवणे हे महामंडळासमोरील प्रमुख आव्हान असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

000000

 

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हा नियोजन समितीची

पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

निरपराध हिंदूंना गुंतवणार्‍या आणि अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्‍या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबई येथे प्रकाशन,बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल !- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक  

आझाद मैदान दंगल : १३ वर्षे झाली, तरी वसुली नाही व कारवाई शून्य !हानीभरपाईची कारवाई थांबवणे धक्कादायक; दोषींवर दिवाणी दावे दाखल करून रझा अकादमीकडून वसुली करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैध एलपीजी गॅस वापर उघड; चेंबूर–देवनार येथे दोन गुन्हे नोंद

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम