नवी मुंबई प्रतिनिधी जनगणना 2027 चे काम नियोजनबध्द रितीने सुरू असून प्रगणकांव्दारे घरोघरी जाऊन गृहगणना केली जात आहे. या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्र येथे 150 हून अधिक प्रगणकांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण फिल्ड ट्रेनर यांच्यामार्फत उत्तम रितीने पार पडले. प्रशिक्षणानंतर एपीएमसी, सिडको तसेच शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी समाधान व्यक्त केले आणि जनगणनेचे काम करण्यास स्वेच्छेने स्वीकृती दर्शवली.
महाराष्ट्र राज्यामध्ये जनगणनेचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे काम दिनांक 16 मे पासून सुरू झाले आहे. हे काम दिनांक 14 जून पर्यंत सुरू असणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांना जनगणनेविषयक आपल्या घराची व कुटुंबाची सत्य माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या घरी येणारे प्रगणक हे शासकीय कर्मचारी असून या राष्ट्रीय कामामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे त्यामुळे नागरिकांनी त्यांचे स्वागत करावे आणि त्यांना आवश्यक संपूर्ण माहिती पुरवावी. ही माहिती राष्ट्रीय नियोजनाप्रमाणेच त्या त्या क्षेत्रामध्ये शासकीय योजना राबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आपल्या क्षेत्रातील विकास कामे ही या आकडेवारीवर अवलंबून असतात याची नोंद घ्यावयाची आहे.
तरी नागरिकांनी आपल्या घरी येणा-या प्रगणकाचे अधिकृत ओळखपत्र तपासून त्यांना आवश्यक माहिती पुरवावी आणि जनगणनेच्या राष्ट्रीय कामामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रमुख जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. #Census2027 #जनगणना2027 #Census