
जिल्ह्यात पुरेसा जलसाठा उपलब्ध; पाटबंधारे विभागाची माहितीअफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
बुलढाणा, द प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जलसाठ्याबाबत प्रसिद्ध झालेल्या “खडकपूर्णा प्रकल्प शून्यावर” तसेच “13 प्रकल्प कोरडे” या वृत्तामुळे नागरिकांमध्ये जलटंचाईबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख आणि मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठ्यासह मोठ्या प्रमाणात मृत साठा उपलब्ध असल्याने सध्या पाणीटंचाईची परिस्थिती नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वृत्तातील आकडेवारी ही केवळ उपयुक्त जलसाठा (लाईव्ह स्टोरेज) यावर आधारित असून धरणांमधील मृत साठा (डेड स्टोरेज) विचारात घेण्यात आलेला नाही. त्यामुळे काही प्रकल्प पूर्णपणे कोरडे असल्याचा निष्कर्ष वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे विभागाने म्हटले आहे.
17 जून 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण 77.12 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. याशिवाय खडकपूर्णा प्रकल्पात 67.20 दशलक्ष घनमीटर मृत साठा शिल्लक असून प्रकल्प पूर्णपणे कोरडा असल्याचा दावा चुकीचा असल्याचे विभागाने स्पष्ट केले. तसेच ज्ञानगंगा, पलढग, मस, कोराडी, मन आणि उतावळी या सहा मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण 57.82 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता तातडीची जलटंचाई निर्माण होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले
दरम्यान, उपलब्ध जलसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अनधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. विभागांतर्गत सर्व उपविभागीय कार्यालयांना महसूल विभागाच्या समन्वयाने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाटबंधारे विभागाने नागरिकांना अफवा किंवा अपूर्ण माहितींवर विश्वास न ठेवता अधिकृत आकडेवारीवर आधारित माहितीच ग्राह्य धरण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात येत असून पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
00000



