बुलडाणा, प्रतिनिधी: जागतिक आरोग्य संघटनेमार्फत दि. ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणुन साजरा केला जातो. त्यादिनाचे औचित्त साधुन आरोग्य विभागाकडुन राज्यभर राबवल्या जाणाऱ्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचे जिल्हा स्तरीय उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांचे हस्ते संपन्न झाले.
कर्करोगाबाबत जनजागृती निर्माण व्हावी व ह्या रोगाच्या प्राथमिक अवस्थेत त्याचे निदान होवून योग्य वेळी उपचार व्हावे, हा त्यामागचा प्रमुख हेतू आहे. ह्यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे “UNITE BY UNIQUE” या थीमसह जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या संकल्पनेतून जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून “कर्करोग निदान व जनजागृती मोहीम” राज्यभरात आयोजित करण्यात आले आहेत. या मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले. राज्यस्तरावरील मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हास्तरावर आयोजित उद्घाटन कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणजीत मंडाले, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, इंडीयन डेंटल असोसियशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. जतकर व जिल्हा सचिव डॉ.गवई आदी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी आमदार संजय गायकवाड यांनी शासनाच्या विविध योजनाची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरावर वेळोवेळी पाठपुरवठा करण्यात येईल, असे सर्व उपस्थितांना आश्वासित केले.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणजीत मंडाले ह्यांनी “कर्करोग निदान व जनजागृती मोहीम” तसेच राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत विस्तृत प्रस्तावना उपस्थितांना विषद केली. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी गर्भाशय मुख कर्करोगाबाबत प्राथमिक अवस्थेत निदानाच्या विविध पद्धतीचा उपयोग शासकीय यंत्रणेत कसा करावा, ह्या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील कर्करोग तज्ञ डॉ. निखील नलावडे, हृदयरोग तज्ञ डॉ. दीपक लद्धड, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मगर यांचा कर्करोग क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे प्रभारी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. पंकज राठोड ह्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान जिल्हा रुग्णालयातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी, मुख्य अधिपरिचारिका, परिचारिका जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या, प्राध्यापक व विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते. 00000