महसूली दावे निकाली काढण्यासाठी महसूल लोक अदालतचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात दि. 11 ऑगस्ट रोजी महसूल अदालत
रायगड प्रतिनिधी– जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे विविध कारणा मुळे प्रलंबित व सुरू असलेले दावे निकाली काढण्यासाठी महसूल लोक अदालतीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. दि. 11, 18 आणि 25 ऑगस्ट रोजी अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार स्तरावर स. 11 वा महसूल लोक अदालतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली. सर्व पक्षकार व विधिज्ञ यांनी या लोक अदालतीचा लाभ घेऊन प्रकरणे तत्परतेने निकाली काढावीत असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे
या महसूल लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून एकच सुनावणी बोर्ड असलेल्या तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी तीन सुनावणी घेऊन प्रकरण निर्णयार्थ ठेवायचे आहे. सर्व तहसीलदार स्तरावरील तसेच उपविभागीय अधिकारी अलिबाग, पेण, रोहा, श्रीवर्धन यांच्या स्तरावरील महसूल अदालत दि. 11, 18 आणि 25 ऑगस्ट रोजी होणार आहेत. पनवेल, कर्जत, माणगाव, महाड उपविभागीय स्तरावरील महसूल अदालत तीन टप्प्यात होणार आहे. पाहिला टप्पा 11, 18, 25 ऑगस्ट, दुसरा टप्पा 14, 21, 28 ऑगस्ट तर तिसरा टप्पा 22, 29 ऑगस्ट आणि 12 सप्टेंबर रोजी प्रस्तावित आहेत.
अपर जिल्हाधिकारी स्तरावरील महसूल अदालत अलिबाग, मुरुड आणि पेण तालुक्यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे दि. 11, 18 आणि 25 रोजी होणार आहे. तर दि. 12, 19 आणि 26 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय माणगाव येथे माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, सुधागड तालुक्यासाठी महसूल अदालत आयोजित केली आहे. पनवेल, उरण कर्जत, खालापूर तालुक्यासाठी अपर तहसीलदार कार्यालय पनवेल येथे दि. 22, 29 ऑगस्ट आणि 12 सप्टेंबर रोजी ही अदालत होणार आहे.
या महसूल अदालतीसाठी अपीलात नोटीस रुजू न झालेल्या अपिलाथों व उत्तरार्थी यांना आगाऊ नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच महसूल लोक अदालत मध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याकरीता अपीलांची सुनावणी ही एकाच दिवशी सकाळी (11.00 वा) व दुपारी (3.00 वा) अशा दोन सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. अपिलार्थी यांनी उत्तरार्थी यांना नोटीसची बजावणी करणे,अपील किंवा दावे यामध्ये पक्षकार मयत असल्यास मयत व्यक्तींचे वारस रेकॉर्डवर घेणे व वारसांना नोटीसची बजावणी करणे.अपिलार्थी यांनी उत्तराची यांना नोटीस बजावणी झाली नसल्यास उत्तरार्थी यांना हजर होणेकामी वर्तमान पत्रात जाहिर नोटीस प्रसिद्धीस देण्यात येईल.
प्रलंबित प्रकरणांचा जलद व सुसंवादी मार्गाने निकाल लावण्यासाठी संबंधितांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा आणि जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही अपर जिल्हाधिकारी श्री थोरवे यांनी केले आहे.