vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कोपरखैरणे परिसरात 1100 हून अधिक विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करीत दिला मतदानाचा संदेश*

*कोपरखैरणे परिसरात 1100 हून अधिक विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करीत दिला मतदानाचा संदेश*

 

   नवी मुंबई प्रतिनिधी-       नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीमध्ये सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत असून आज नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 36 व 122 कोपरखैरणे गाव येथील 1100 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी एकत्र येत भव्यतम मानवी साखळी तयार करुन 15 जानेवारी रोजीच्या महापालिका निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन केले.

          निवडणूक‍ विषयक स्वीप कार्यक्रमांचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे व केंद्र समन्वयक श्री. जयप्रकाश सिंह यांच्या नियंत्रणाखाली हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. डॉली चराटकर व श्रीम. दिपाली संखे यांनी तसेच कलाशिक्षक श्री. प्रशांत गाडेकर व इतर शिक्षकांनी पुढाकार घेतला. तसेच कार्यकारी अभियंता तसेच कार्यकारी अभियंता श्री. अजय संखे व उपअभियंता श्री. संतोष शिकतोडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

          ‘मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो’, ‘माझे मत माझा अधिकार’, ‘वोट कर नवी मुंबईकर’, ‘वोट करा वोट करा – आमच्या भविष्यासाठी वोट करा’ – अशा विविध प्रकारच्या घोषणा देत तसेच वेगवेगळया प्रकारची घोषवाक्य लिहीलेले फलक उंचावत विद्यार्थ्यांनी कोपरखैरणे परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांमध्ये व मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

          या वर्षी प्रथमत:च महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पध्दतीने होत असून 1 ते 27 क्रमांकाच्या प्रभागातील प्रत्येक मतदाराला प्रभागातील अ, ब, क, ड अशा 4 जागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे मतदान करावयाचे आहे. तसेच 28 क्रमांकाच्या प्रभागातील प्रत्येक मतदाराला प्रभागातील अ, ब, क अशा 3 जागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे मतदान करावयाचे आहे. या विषयी नागरिकांमध्ये बहुसदस्यीय पॅनल पध्दतीत कसे मतदान करावयाचे याबाबत माहितीपत्रके वितरीत करुन, ठिकठिकाणी बॅनर प्रदर्शित करुन, डिजीटल बॅनरव्दारे प्रसिध्दी करुन, सिनेमागृहांमध्ये व्हिडीओ चित्रफिती प्रसारित करुन, विविध समाज माध्यमांवरुन चित्रफितींव्दारे माहिती दिली जात आहे.

          नवी मुंबई महानगरपालिका स्वीप कार्यक्रमांतर्गत अनेक अभिनव उपक्रम राबवित असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोपरखैरणे गाव शाळा क्रमांक 36 व 122 यांनी परिसरात रॅली काढून तसेच भव्यतम मानवी साखळी करुन राबविलेल्या अभिनव उपक्रमालाही उत्तम प्रतिसाद लाभला.

000

संबंधित पोस्ट

पोषण अभिसरण समिती व कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

vishwatmaklokswamivarta

कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जखमींची विचारपूस करून दिला धीर

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांचा ‘समृद्धी’ गाळप हंगामासाठी सज्ज :समृद्धी साखर कारखान्यात 2025-26 हंगामाचे रोलर पूजन

प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे देण्याची म्हणजेच,मिनिटाला 32,000 तिकीटे देणाऱ्या सध्याच्या प्रणालीच्या पाच पट क्षमता असलेली नवी प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्षअखेरीपर्यंत तयार होणार प्रवाशांची सोय आणि स्मार्ट तिकीट प्रणालीवर भर देत भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली बहुभाषिक बनवणार

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta