vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जनगणना २०२७: नागरिकांसाठी १५ मे पर्यंत ‘स्व-गणना’ करण्याची संधी

जनगणना २०२७: नागरिकांसाठी १५ मे पर्यंत ‘स्व-गणना’ करण्याची संधी

विशेष प्रतिनिधी

भारताची जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) हा सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिकांना १ मे ते १५ मे या कालावधीत स्वतःच्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन नोंदवता येणार आहे. या प्रक्रियेसाठी एक सर्वसमावेशक प्रश्नावली तयार केली असून, त्यामध्ये कुटुंबाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा वेध घेणारे विविध प्रश्न समाविष्ट आहेत.

या प्रश्नावलीची सुरुवात कुटुंब प्रमुखाचे नाव आणि मोबाईल क्रमांकापासून होते. यामध्ये घराच्या बांधकामासाठी वापरलेल्या साहित्याचा सविस्तर तपशील विचारण्यात आला आहे, ज्यामध्ये जमिनीसाठी माती, विटा, सिमेंट किंवा टाईल्स , भिंतींसाठी दगड, कच्च्या विटा किंवा कॉक्रीट , आणि छप्परासाठी कौले, लोखंडी पत्रे किंवा कॉक्रीट यांपैकी कोणत्या साहित्याचा मुख्यत्वे वापर झाला आहे याची नोंद करावी लागेल. घराचा वापर केवळ निवासासाठी होतो की व्यवसाय, शिक्षण किंवा आरोग्य सेवांसाठी, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. तसेच, घराची सद्यस्थिती राहण्यायोग्य आहे की मोडकळीस आली आहे, यावरही कुटुंबांनी माहिती द्यायची आहे.

कुटुंबातील सदस्यांच्या माहितीमध्ये एकूण संख्या, लिंग (पुरुष, स्त्री, किंवा ट्रान्सजेंडर) आणि सामाजिक प्रवर्ग (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर) यांचा समावेश आहे. घराच्या मालकी हक्काबाबत माहिती देताना ते स्वतःचे आहे की भाड्याचे, हे नमूद करावे लागेल. कुटुंबाच्या राहणीमानाचा स्तर तपासण्यासाठी निवासयोग्य खोल्यांची संख्या आणि विवाहित जोडप्यांची संख्या विचारली गेली आहे. मुलभूत सुविधांमध्ये पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत जसे की प्रक्रिया केलेले नळ पाणी, विहीर, कूपनलिका किंवा टँकर आणि त्याची उपलब्धता किती अंतरावर आहे, याची नोंद करणे बंधनकारक आहे. प्रकाशासाठी वीज किंवा सौर ऊर्जेचा वापर होतो का, हे देखील स्पष्ट करावे लागेल.

स्वच्छतेच्या दृष्टीने प्रश्नावलीत महत्त्वाचे प्रश्न आहेत. कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय आहे की ते सार्वजनिक सुविधेचा वापर करतात, तसेच शौचालयाचा प्रकार (फ्लश, सेप्टिक टँक किंवा इतर) कोणता आहे, याची माहिती द्यावी लागेल. सांडपाणी निचऱ्यासाठी बंद किंवा उघड्या गटारांची व्यवस्था आणि स्वतंत्र स्नानगृहाची उपलब्धता याबाबतही प्रश्न विचारण्यात आले आहेत. स्वयंपाकासाठी एलपीजी/पीएनजी जोडणीची उपलब्धता आणि इंधन म्हणून लाकूड, रॉकेल, वीज किंवा बायोगॅस यांपैकी कशाचा वापर होतो, हे देखील कुटुंबांना नमूद करावे लागेल.

डिजिटल इंडियाच्या काळात कुटुंबांकडे उपलब्ध असलेल्या आधुनिक साधनांची माहितीही या जनगणनेत संकलित केली जात आहे. यामध्ये रेडिओ, दूरचित्रवाणी (डिश किंवा केबल), लॅपटॉप, संगणक आणि इंटरनेट सुविधेची उपलब्धता (मोबाईल किंवा अन्य उपकरणांवर) या गोष्टींचा समावेश आहे. तसेच कुटुंबाकडे सायकल, दुचाकी किंवा चारचाकी वाहन आहे का, याचीही नोंद घेतली जाईल. शेवटी, कुटुंबात प्रामुख्याने सेवन केले जाणारे धान्य जसे की तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी किंवा मका याविषयी माहिती विचारण्यात आली आहे. १५ मे पर्यंत जास्तीत जास्त नागरिकांनी या स्व-गणना सुविधेचा वापर करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

– संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

*****

संबंधित पोस्ट

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन आपली संस्कृती जपत परंपरा पुढे नेऊया – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा,आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने मंत्री, सचिव, आयुक्तांसोबत सहविचार सभा…

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे — डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन