vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची सरळगाव येथे माहिती; पशुपालकांनी योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी पशुपालक व पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा ‘कृती संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची सरळगाव येथे माहिती; पशुपालकांनी योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी पशुपालक व पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा ‘कृती संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

ठाणे, प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे) : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील पशुपालकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती अधिकाधिक पशुपालकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने मुरबाड तालुक्यातील मौजे सरळगाव येथे पशुपालक व पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा ‘कृती संगम’ कार्यक्रम दि. १६ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आला.

 

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन क्षेत्रात सुशिक्षित पशुपालकांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांची सविस्तर माहिती यावेळी उपस्थित पशुपालकांना देण्यात आली.

 

कार्यक्रमात एक दुधाळ जनावर गट, दोन दुधाळ जनावरे गट, पाच अधिक एक शेळी गट, ५०० पक्षी क्षमतेच्या कुक्कुटपालन घटकांसाठी आर्थिक सहाय्य, मुरघास निर्मितीसाठी अनुदान, पशुपालकांच्या दारी असलेल्या दुधाळ जनावरांसाठी कॉलर आयडी सुविधा, आवश्यकतेनुसार कडबा कुट्टी यंत्राचे अनुदानावर वितरण, जागेच्या कमतरतेमुळे सकस हिरवा चारा निर्मितीसाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानास अनुदान तसेच शेतीच्या कामासाठी बैलजोडी वितरण अशा विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी उपस्थित पशुपालकांना योजनांची पात्रता, अर्ज प्रक्रिया, अनुदानाची रचना आणि पशुपालन व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. पशुपालन हा केवळ पूरक व्यवसाय न राहता ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराचे प्रभावी साधन बनू शकतो, असे त्यांनी सांगितले.

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अजित हिरवे तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मुरबाड डॉ. श्रवणसिंग यांनीही पशुपालकांना शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन करत पशुधन व्यवस्थापन, दुग्ध उत्पादन वाढ, पशू आरोग्य सेवा आणि आधुनिक पशुपालन पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.

 

यावेळी पशुपालकांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. शासनाच्या योजनांविषयी मिळालेल्या सविस्तर माहितीस पशुपालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

 

“पशुसंवर्धन क्षेत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना आर्थिक बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुशिक्षित युवकांनी दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन क्षेत्रात उद्योजकतेच्या संधी शोधून या योजनांचा लाभ घ्यावा. शासनाच्या सहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व फायदेशीर बनविता येईल,” असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी केले आहे.कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने पशुपालक, पशुप्रेमी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

दापूर माळ विकासकामांना प्रत्यक्ष प्रारंभ; रस्ते, घरकुल, पाणीपुरवठा व शाळा बांधकामाला गती

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

vishwatmaklokswamivarta

गुणवत्तापूर्ण शिक्षक निवडण्यासाठी पारदर्शक निवड प्रणाली राबवावी- राज्यपाल-मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी अनुदान

भैय्यासाहेब देशमुख यांचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा- भैय्यासाहेबांसारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व राजकारणात विरळा : हर्षवर्धन सपकाळ

vishwatmaklokswamivarta

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचा 14 मे रोजी भूमिपूजन