vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नमुंमपा शाळांतील शिक्षक गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे मोठे काम करतात – वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक

नमुंमपा शाळांतील शिक्षक गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे मोठे काम करतात – वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक

 

          नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थी घडविण्यासोबतच सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे होत असून महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा व संस्कारांचा दर्जा उच्च असून याचे सारे श्रेय शिक्षकांना असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिक्षक दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

          याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्यासमवेत महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती श्रीम.रंजना सोनवणे, ड प्रभाग समिती अध्यक्ष श्री.प्रकाश मोरे, फ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम.ललिता मढवी, एच प्रभाग समिती अध्यक्ष श्री. भरत भोईर, अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, शिक्षण विभाग उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ.अमोल पालवे, शिक्षणाधिकारी श्री.अशोक कडुस, सहा.आयुक्त श्री.सागर मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

          शिक्षण पध्दतीत व शैक्षणिक साधनांमध्ये काळानुरूप बदल झालेला असला तरी शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेली आदराची भावना आजही तीच असून नवी मुंबई महानगरपालिका बदलत्या काळानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण पध्दतीत चांगले बदल घडवित असल्याबद्दल मंत्रीमहोदयांनी समाधान व्यक्त केले.

          याप्रसंगी बोलताना महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी महापालिकेच्या शाळेत प्रामुख्याने गोरगरीबांची मुले शिकतात हे लक्षात घेऊन प्राथमिक शाळा हा पुढील जीवनप्रवासाचा पाया असून तो पक्का करून घेण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये केजीचे वर्ग इंग्रजी भाषेत सुरू केल्याची माहिती दिली. चांगला शिक्षक हा अभ्यासातले गुण वाढवतोच सोबतच व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करतो असे सांगत महापौर महोदयांनी आपल्या शिक्षकांमुळेच नवी मुंबईच्या शिक्षण व्हिजनचा नावलौकिक सर्वत्र असल्याची भावना व्यक्त केली.

          उपमहापौर श्री.दशरथ भगत यांनी शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वातून होतो असे सांगत देशाची भावी पिढी घडविणा-या गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. खाजगी शाळांतील शिक्षकांपेक्षा महापालिका शाळेतील शिक्षक महनीय काम करीत असतात, कारण यांच्याकडे येणारी मुले सर्वसामान्य घरांतून आलेली असतात असा वेगळा दृष्टीकोन उपमहापौरांनी मांडला. सुगंधी शहर अभियानांतर्गत आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ व सुगंधी करून आपण मंत्री महोदयांना स्नेहभेट द्यावी असेही आवाहन त्यांनी केले.

          शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांनी मागील वर्षभरातील शिक्षण विभागाच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीचा आढावा घेत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी जे उज्ज्वल यश शिष्यवृत्ती परीक्षेत, दहावी बोर्ड परीक्षेत, विविध स्पर्धा परीक्षा, प्रदर्शने, क्रीडा – सांस्कृतिक पातळीवर उपक्रम यामध्ये संपादन केले त्याची माहिती दिली. आजचे विद्यार्थी हे शहराचे उद्याचे सुसंस्कृत नागरिक होणार असल्याने शाळा म्हणजे शहराच्या भविष्याची गुंतवणूक असल्याचे मत मांडत त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये सर्वच बाबतीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा अग्रेसर असल्याचे उदाहरणे देत सांगितले.

          यावेळी इ. चौथी, पाचवी, सातवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे – मार्च 2026 मधील एसएससी बोर्ड परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतून पहिल्या 3 क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या तसेच प्रत्येक विषयात सर्वाधिक गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांना गौरविण्यात आले. याशिवाय विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तसेच उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणा-या विद्यार्थी आणि शिक्षकांचीही विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक व शिक्षकांनाही सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले.

          नमुंमपा शाळा क्र. 15 शिरवणे येथील विद्यार्थिनी समुहाने स्वरस्वती वंदना व स्वागत गीत सादर करून सुरू झालेल्या या शिक्षक दिन समारंभात विविध संस्थांनी नाट्यगृहाच्या बाहेरील पॅसेजमध्ये शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन मांडले होते. मंत्रीमहोदय व महापौरांसह इतर मान्यवरांनी त्याचे अवलोकन करून कौतुक केले. शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करीत आयोजित करण्यात आलेला हा शिक्षकांसह विद्यार्थी गुणगौरव सोहळा भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रेरणादायी स्मृतींना जयंतीनिमित्त अभिवादन करीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

संबंधित पोस्ट

सातारा जिल्ह्यातील १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर*

मनसेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरें यांनी मंत्री भाजपा नेते आशिष शेलारांची यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले 

राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विद्युतपुरवठा खंडित,युद्ध पातळीवर सुरळीत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थविरोधी ठाणे; जिल्हा प्रशासनाने केला संकल्पअंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी सर्वांना प्रेरणा देण्याचा जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा निर्धार

vishwatmaklokswamivarta