युआयडीएआय कडून अलिबाग येथे नवीन आधार सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न
रायगड-अलिबाग प्रतिनिधी) : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI), मुंबई प्रादेशिक कार्यालयाकडून अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते नवीन आधार सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले.या कार्यक्रमास, जि. प. सदस्य आदिती दळवी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, युआयडीएआय मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे केंद्र व्यवस्थापक कनाई बिस्वास आणि Protean eGov Technologies चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विश्वासार्ह डिजिटल ओळख सेवा प्रदान करणे आणि ‘डिजिटल इंडिया’चे व्हिजन मजबूत करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. प्रमुख ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. सोयीस्कर प्रवेश- आधार सेवा केंद्र, जमाल मॅन्शन, बाजार पेठ, अलिबाग येथील हे केंद्र आठवड्याचे ७ दिवस सुरु राहील. यामध्ये नवीन नोंदणी, ५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, लोकसंख्याशास्त्रीय (डेमोग्राफिक) दुरुस्ती आणि तक्रार निवारण सेवा उपलब्ध असतील. समावेशक पायाभूत सुविधाः या केंद्रामध्ये आधुनिक सुविधा, व्हीलचेअर प्रवेश, सुलभ स्वच्छतागृह आणि अखंड सेवा वितरणासाठी समर्पित एएसके व्यवस्थापक तैनात आहेत. डिजिटल साधनेः नागरिक UIDAI अपॉइंटमेंट पोर्टलवरून (https://bookappointment.uidai.gov.in) आगाऊ अपॉइंटमेंट बुक करू शकतात. तसेच भुवन आधार पोर्टलवर (https://bhuvan-app3.nrsc.gov.in/aadhaar) जिओ-टॅग केलेली केंद्र स्थाने उपलब्ध आहेत. भविष्य-सज्ज सेवाः पुढील पिढीची डिजिटल ओळख सुरक्षित करण्यासाठी शाळांमध्ये विशेष बायोमेट्रिक अपडेट शिबिरे आयोजित केली जात आहेत.
या प्रसंगी बोलताना आमदार महेंद दळवी म्हणाले की, रायगडमधील हे आधुनिक आधार सेवा केंद्र आपल्या रहिवाशांसाठी जलद, अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा सुनिश्चित करेल. डिजिटल इंडियाचे व्हिजन साकार करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.” सर्व आधार सेवा केंद्रे थेट युआयडीएआयद्वारे चालवली जातात, जेणेकरून समान सेवा दर्जा, मजबूत डेटा सुरक्षा आणि वेळेवर तक्रार निवारण सुनिश्चित करता येईल.