
बंजारा समाजाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी लोकसभा, राज्यसभेत पाठवावे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शंकर पवार यांचे आवाहन
रमेश औताडे , मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रात आणि देशातील विविध भागातील बंजारा समाजाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी लोकसभा किंवा राज्यसभेत आपल्या खासदारांची संख्या कमी आहे. बंजारा समाजाच्या गोर बोली संदर्भात खासदर उमेश जाधव यांनी आवाज उचलला होता मात्र ते त्याठिकाणी एकटे असल्यामुळे त्यांना आपला लढा तीव्र करता आला नाही. म्हणून बंजारा समाजाने एकत्र येत जास्तीत जास्त बंजारा समाजाचे लोकप्रतिनिधी लोकसभा, राज्यसभेत पाठवावे असे आवाहन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शंकर पवार यांनी केले आहे.
मुंबईतील सांतक्रुझ येथे भव्य बंजारा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून धर्मगुरु बाबुसिंग महाराज, खासदार डॉ. उमेश जाधव, आमदार अविनाश जाधव, राज्याचे आरोग्यदूत रामेश्वर नाईक, कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड, मलाईका गुत्तेदार आणि समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची कार्यकारणी जाहीर केली.
डॉ शंकर पवार म्हणाले की, बंजारा समाजाने एकता दाखविल्यामुळे एका मोठ्या राष्ट्रीय नेत्याचा आपण पराभव करत डॉ.उमेश जाधव यांना खासदार बनविले. संत रामराव महाराज यांचे स्वप्न पूर्ण करणारे खासदार उमेश जाधव आहेत. मी कोणत्याही पक्षाचा किंवा व्यक्तीचा माणूस नाही . समाजाच्या विकासासाठी कॅबिनेट मंत्री संजय राठोड आणि खासदार उमेश जाधव प्रयत्न करत आहे. नगारा भवनच्या माध्यमातून आगामी पिढीला बंजारा समाजाचा इतिहास कळणार आहे. ठाण्यात आपण केलेल्या मेळाव्यामुळे नवी मुंबईत आपल्याला ३ एकर जागा बंजारा भवनसाठी मिळाली असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
खासदार उमेश जाधव म्हणाले की, भारतात बंजारा समाजाचे युग सुरु झाला आहे. संत सेवालाल महाराज यांचा जो आपण दिल्लीत झेंडा फडकवीला तो झेंडा आपण दिल्लीत कायम ठेवण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे.
आरोग्यदूत रामेश्वर नाईक म्हणाले की, गोद्री गावात कुंभाच्या माध्यमातून बंजारा – लबाना समाजाने एकताचे प्रतिक दाखविले. स्नेहसंमेलनामुळे बंजारा समाज एकत्र येतो आणि आपले विचाराचे आदानप्रदान करतो यामुळे समाजात एकता राहते. त्यामुळे आम्ही बंजारा कुंभ घेतला, या कुंभामुळे देशाला नाही तर जगाला बंजारा समाजाचा इतिहास कळाले असल्याचे नाईक म्हणाले.



