
प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा; जिल्ह्यातील यंत्रणा प्रमुखांचे प्रशिक्षण नियोजन व मूल्यमापनासाठी प्रशिक्षण आवश्यक- विभागीय आयुक्त दिलीप गावडे
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- जिल्ह्यात होत असलेले व होऊ घातलेले मोठ्या गुंतवणूकीचे पायाभुत सुविधा प्रकल्प कार्यान्वित करतांना प्रकल्पाचे नियोजन व प्रगतीचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. त्यात अचूकता व गतिमानता येण्यासाठी प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा या पोर्टलवरील माहितीचा उपयोग होणार आहे, त्यासाठी दिल्या जात असलेल्या प्रशिक्षणाचा सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा,असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज जिल्ह्यातील यंत्रणा प्रमुखांना दिले.
पायाभूत सुविधांशी निगडीत मोठे प्रकल्प कार्यान्वित करतांना प्रशासकीय प्रक्रियांची पूर्तता व प्रगतीची तपासणी, विविध विभागांमार्फत करावयाच्या उपाययोजनांचे अभिसरण याप्रक्रिया ऑनलाईन करणे व देखरेख करणे यासाठी प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा (PM Gati ShaktiNationa Master Plan) पोर्टल तयार करण्यात आले असून या पोर्टलवर करावयाच्या कामकाजाविषयी आज एमआयटी संस्थेत यंत्रणाप्रमुखांचे प्रशिक्षण घेण्यात आले. एमआयटी महाविद्यालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रथम सत्रात माहिती व द्वितीय सत्रात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देऊन प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील विभागांचे यंत्रणाप्रमुख व कर्मचारी असे १२० जण याप्रशिक्षणात सहभागी झाले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, ‘वाल्मि’संस्थेचे आयुक्त प्रकाश खपले, उपायुक्त विजय पवार, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्रा (MRSAC)मार्फत आलेले तज्ज्ञ प्रशिक्षक डॉ. संजीव वर्मा व डॉ. श्रीमती टुटू सेनगुप्ता, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी उपस्थित होते.
कामकाजात येणार अचूकता आणि गतिमानता- जिल्हाधिकारी स्वामी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, या पोर्टलद्वारे सगळे कामकाज आता ऑनलाईन होणार असून प्रशासकीय कामाचा वेळ वाचणार आहे. एखादा प्रकल्प राबवितांना त्यात अनेक विभागांचा सहभाग व समन्वय असतो. अशावेळी प्रत्येक विभागाकडून प्रकल्पासाठी करावयाची पूर्तता विहित वेळेत होणे आवश्यक आहे. अशा सर्व संबंधित विभागांनी प्रकल्पासाठी आपापल्या विभागामार्फत केलेल्या कामकाजाच्या प्रगतीची माहिती पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. जेणेकरुन वरिष्ठ पातळीवर कामाच्या प्रगतीचे अवलोकन करता येऊ शकेल. या प्रशिक्षणामुळे कामकाजात गतिमानता व अचुकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नियोजन व मूल्यमापनासाठी प्रशिक्षण उपयुक्त-विभागीय आयुक्त गावडे , विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीत अनेक विभागांचा समन्वय असतो. त्या प्रकल्पांचे नियोजन व कार्यान्वयन करण्यासाठी या पोर्टलवर भरावयाच्या माहितीचा उपयोग होणार आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील गुंतवणूक करतांना या बाबींचा विचार होणे आवश्यक असते. त्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्पांची माहिती वेळेत व अचूक सादर करावयाची आहे. प्रशासनाला अचूकता व गतिमानता येण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार असून प्रशासन व शासनस्तराच्या उच्च पातळीवर या माहितीचे अवलोकन एका क्लिकवर होऊ शकेल. या प्रशिक्षणाचा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
०००००



