प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना-देशात महाराष्ट्र आणि राज्यात छत्रपती संभाजीनगर प्रथम
छत्रपती संभाजीनगर द प्रतिनिधी- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सर्वाधिक २२ हजार १० प्रकल्पांना मंजूरी महाराष्ट्रात देण्यात आली तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८९५ प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात हा उच्चांक आहे.
राज्य नोडल अधिकारी कृषी संचालक (कृषी प्रक्रिया व न्नियोजन) कृषी आयुक्तालय विनयकुमार आवटे यांच्या कार्यालयाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्यात २२०१० प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. यातील सर्वाधिक प्रकल्प १८९५ हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे.अशाप्रकारे छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. त्या खालोखाल अहिल्यानगर, सांगली, नाशिक आणि पुणे अशी क्रमवारी आहे.
अशी आहे योजना-शेतकऱ्यांना शेतीसह जोडधंदा अथवा गावात, लहान खेड्यात करता येण्यासारख्या व्यवसायांकरीता कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारु शकते. यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविली जाते. ग्रमिण व शहरी भागातील लाभार्थी या योजनेत सहभागी होऊ शकतात व तसा त्यांचा प्रतिसादही योजनेला लाभत आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक, गट लाभार्थी ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सामाईक पायाभुत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, मूल्य साखळी, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बीज भांडवल, मार्केटींग, ब्रॅण्डींग अशा घटकांकरीता अर्थसहाय्य या योजनेतून दिले जाते.बीज भांडवल घटकांपर्यंत गटांच्या सदस्यांना जास्तीत जास्त ४० हजार रुपये प्रति सदस्य तर ४ लाख रुपये प्रति गट याप्रमाणे अर्थ सहाय्य दिले जाते. प्रक्ल्प खर्चाच्या ५० टक्के रक्कम मार्केटींग व ब्रॅंडींगसाठी दिली जाते. या योजनेतील लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर मोफत प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत राज्यात २९ हजार १८३ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा सुद्धा देशात उच्चांक आहे.
२२६३ कोटी रुपयांची गुंतवणूक,देशात सर्वाधिक प्रकल्प म्हणजेच २२०१० महाराष्ट्राने मंजूर केले आहेत. द्वितीय क्रमांक बिहार तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश ही राज्ये आहेत. याचा परिणाम म्हणून राज्यात २२६३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ३८९ कोटी रुपयांचे अनुदानही लाभार्थ्यांना देण्यात आले आहे,
मंजूर प्रकल्प (प्रक्रियानिहाय)राज्यात मंजूर झालेल्या २२०२२ प्रकल्पांमध्ये तृणधान्य उत्पादने-४३६९, मसाले उत्पादन ३५२२, भाजीपाला उत्पादने ३२४२, कडधान्य उत्पादने २७३३, फळ उत्पादने-२१६०, दुग्ध उत्पादने-२०९९, तेलबिया उत्पादने-८३०, पशुखाद्य उत्पादने-५५३, तृणधान्य उत्पादने-५२३, उस उत्पादने-४४६, मांस उत्पादने-१२०, वन उत्पादने-९८, लोणचे उत्पादने-४१, सागरी उत्पादने-३९ इतर १३१२ या प्रमाणे प्रकल्प मंजूर झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १८९५ प्रकल्प मंजूर असून त्यातील ७०२ छत्रपती संभाजीनगर तालुक्यात, १३२ पैठण, ४५१ फुलंब्री, ८८ वैजापूर, १२८ गंगापूर, ३०५ खुलताबाद, ५४ सिल्लोड, २२ कन्नड, १३ सोयगाव प्रकल्पांचा समावेश आहे. मुळ उद्दिष्टाच्या ११३.१९ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने आवळा उत्पादने-१, पशुखाद्य-३, बेकरी उत्पादने-५, काजू उत्पादने-२, दाळ प्रक्रिया-४, मत्स्य व्यवसाय-१, पिठाची गिरणी-३, फळ प्रक्रिया-१, आले लसून पावडर-२, जिरासोडा-१, गुळ उत्पादन-२,मसूर डाळ उत्पादने-१, लिंबू आधारीत उत्पादने-१, मका प्रक्रिया-८२, मसाले प्रक्रिया-३८, दुग्ध उत्पादने-३६, तृणधान्य प्रक्रिया-७, तेल प्रक्रिया -१२, कांदा निर्जलिकरण-६०३, टोमॅटो निर्जलिकरण-४३७, भाजीपाला निर्जलिकरण-५१२, बटाटा चिप्स उत्पादने-४, स्नॅक्स-७, डाळी उत्पादने-११, गहू उत्पादने-१९, सोयाबीन उत्पादने-१, मसाले उत्पादने-३३ अशी एकूण १८९५ प्रकल्प जिल्ह्यात आहेत. त्यात २१ कोटी ३३ लक्ष २३ हजार रुपये इतकी गुंतवणूक झाली आहे,अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
मोफत मोफत मार्गदर्शन सुविधा,प्रकल्प अहवाल तयार करणे, ते बॅंकेकडे सादर करणे, उद्यम इ. बाबतच्या नोंदणी करणे इ. साठी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावरुन संसाधन व्यक्ती मार्फत मोफत मार्गदर्शन केले जाते.
ऑनलाईन अर्ज सुविधा,इच्छुक अर्जदार अर्थात वैयक्तिक लाभार्थी, गट लाभार्थी वा सामाईक पायाभुत सुविधा या घटकांना www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो.बीज भांडवल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी ग्रामिण भागासाठी www.nrlm.gov.in तर शहरी भागासाठी www.nulm.gov.in या संकेतस्थळांवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी कार्यालये, बॅंका, जिल्हा संसाधन व्यक्ती यांच्याशी संपर्क साधावा.