आयुष मंत्रालयाच्या ‘देश का प्रकृती परीक्षण’अभियानाचे ऐतिहासिक पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स-केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव 1.29 कोटीहून अधिक नागरिकांचे प्रकृती परीक्षण 1 लाख 81 हजार स्वयंसेवकांचे योगदान..
आयुष मंत्रालयाच्या ‘देश का प्रकृती परीक्षण’अभियानाचे ऐतिहासिक पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स-केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव 1.29 कोटीहून अधिक नागरिकांचे प्रकृती परीक्षण 1 लाख 81 हजार स्वयंसेवकांचे योगदान..
राज्य प्रतिनिधी -बुलढाणा, : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियानाने अभूतपूर्व पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळवले आहेत, भारतासाठी ही एक ऐतिहासिक उपलब्धी असून समग्र आरोग्य सेवांबद्दल राष्ट्राच्या वचनबद्धतेचे आणि आयुर्वेदाला मिळत असलेल्या जागतिक मान्यतेचे प्रतीक असल्याची माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय पारंपरिक वैद्यक पद्धतीसाठीच्या राष्ट्रीय आयोगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने 20 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथे ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी पूर्णतेनिमित्त समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात या पाच पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सः1. एका आठवड्यात कोणत्याही आरोग्य अभियानासाठी मिळालेल्या सर्वाधिक प्रतिज्ञाः 6,004,912 प्रतिज्ञांसह, किमान आवश्यक असलेल्या 14,571 प्रतिज्ञांचा टप्पा पार करत, एक नवीन जागतिक मानक प्रस्थापित केले, यापूर्वी या प्रकारात कोणताही विक्रम नव्हता.
2. एका महिन्यात कोणत्याही आरोग्य अभियानासाठी मिळालेल्या सर्वाधिक प्रतिज्ञाः 1,38,92,976 प्रतिज्ञांसह, चीनमधील सिग्ना आणि सीएमबी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (शेनझेन, ग्वांगडोंग) यांच्या 58,284 प्रतिज्ञांच्या मागील विक्रमाला मागे टाकले.
3. कोणत्याही आरोग्य अभियानासाठी मिळालेल्या सर्वाधिक एकूण प्रतिज्ञाः 1,38,92,976 प्रतिज्ञांसह, भारतातील झिफी एफडीसी लिमिटेडच्या 5,69,057 प्रतिज्ञांच्या मागील विक्रमाला मागे टाकले.
4. डिजिटल प्रमाणपत्र दाखवत असलेल्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बम: 62,525 फोटोंसह, भारतातील अॅक्सेंचर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या 29,068 फोटोंच्या मागील विक्रमाला मागे टाकले.
5. एकाच वाक्याचा उच्चार करणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन व्हिडिओ अल्बमः 12,798 व्हिडिओंसह, भारतातील घे भरारी, राहुल कुलकर्णी आणि नीलम एडलाबादकर यांच्या 8,992 व्हिडिओंच्या मागील विक्रमाला मागे टाकले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे परिक्षक रिचर्ड विल्यम्स स्टेनिंग (युनायटेड किंगडम) हे खास या कार्यक्रमासाठी पोर्तुगालहून मुंबईत आले होते. त्यांनी सर्व पाच विक्रमांच्या अधिकृत यशाची घोषणा केली आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ना. प्रतापराव जाधव यांना प्रमाणपत्रे प्रदान केली.
केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आयुष आरोग्य प्रणालीच्या सर्व पैलूंमध्ये विकासासाठी मंत्रालयाच्या दृढ वचनबद्धतेवर भर दिला. त्यांनी आयुर्वेद आणि आयुष पद्धतींचा विस्तार करण्यासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचे सविस्तर विवेचन केले आणि या यशस्वी अभियानात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या समर्पण आणि कठोर परिश्रमांचे कौतुक केले.असामान्य प्रतिसाद
राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने या अभियानाच्या प्रारंभाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात देशाच्या मा. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देशातील पहिल्या व्यक्ती म्हणून प्रकृती परीक्षण केले, ज्यामुळे संपूर्ण देशात व्यापक सहभागाला चालना मिळाली. या पहिल्या टप्यात 1.29 कोटीहून अधिक नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले. या उल्लेखनीय यशात 1,81,667 स्वयंसेवकांनी योगदान दिले, ज्यामध्ये 1,33,758 आयुर्वेद विद्यार्थी, 16,155 शिक्षक आणि 31,754 वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश होता. सर्व सहभागी विविध वयोगट, वंश आणि पार्श्वभूमीचे प्रतिनिधित्व केले, ज्यामुळे भारताच्या ‘विविधतेतील एकता’चे खरे रूप दिसून आले. या व्यापक सहभागाने वैयक्तिक आरोग्य व्यवस्थापनात भारताच्या नेतृत्वाची पुनःपुष्टी केली आणि आयुर्वेदाच्या निवारक आरोग्य सेवा व जीवनशैली व्यवस्थापनातील महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. या अभियानातून प्राप्त्ा झालेला डेटा संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, ज्यामुळे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक पद्धती यांच्यातील दरी कमी होईल आणि देशाच्या आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असे केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितले