सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त : जालन्यात काँग्रेस पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा
—————————————-
जालना (प्रतिनीधी) पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जोरदार हल्ला चढवत भारतीय सैन्य दलाने केलेल्या सडेतोड कारवाईचे खा.डॉ.कल्याण काळे आणि माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात काँग्रेस पक्षातर्फे स्वागत करून फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
भारतातील विविध राज्यातून काश्मीर मधील पहेलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप २७ पर्यटकांना पाकिस्तानातून आलेल्या काही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.या घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली आणि निष्पाप पर्यटकांच्या निर्घृणपणे हत्या करणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना कायमस्वरूपी धडा शिकवा अशी मागणी देशभरातील जनतेतून करण्यात आली. केंद्र सरकारने देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेत कारवाईच्या दिशेने पाऊल उचलले. केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवायांना काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा राहील अशी ग्वाही काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली होती. भारतीय सैन्य दलाने अत्यंत नियोजन पद्धतीने आज बुधवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ले चढवत नेस्तनाबूत केले. सैन्य दलातर्फे करण्यात आलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांसह त्यांच्या नातेवाईकांचा खात्मा झाल्याचा दावा केला जात आहे. या यशस्वी कारवाईनंतर जालना लोकसभेचे खासदार डॉ.कल्याण काळे आणि माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी दुपारी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत दहशतवाद विरोधी कारवाईचे स्वागत केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारत माता की जय,सैन्य दलाचा विजय असो, पाकिस्तान मुर्दाबाद अशा विविध घोषणा देत जालनेकरांचे लक्ष वेधले. यावेळी विजय चौधरी, राम सावंत, रमेश गौरक्षक, जगदीश भरतीया, विनोद यादव, कपिल भुरेवाल, सदाशिव भुतेकर, गजानन लाड, शेख अनास, योगेश पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.