
पोलीस पाटील गिरीधर पाटील यांना मिळाला“विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार 2024”
राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल यांच्या वतीने “विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार 2024” साठी ठाणे जिल्ह्यातून भिवंडी तालुक्यातील वळ गावातील गिरीधर रघुनाथ पाटील (पोलीस पाटील) हे मानकरी ठरले आहेत. त्यानुसार नुकतेच दि.1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उल्लेखनीय सेवेच्या सन्मानार्थ सन्मानचिन्ह देवून श्री.गिरीधर रघुनाथ पाटील यांना गौरविण्यात आले आहे.गिरीधर रघुनाथ पाटील यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1964 झाला असून श्री.पाटील यांनी आजपर्यंत पोलीस पाटील संघटना, भिवंडी, महाराष्ट्र राज्य – उपाध्यक्ष 2024-25, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष, भिवंडी विभाग, 2005, कोकण कार्याध्यक्ष, भिवंडी विभाग 2020-2021, भिवंडी तालुका संघटना 2005 ही पदे भूषविली आहेत.
पोलीस पाटील श्री.गिरीधर रघुनाथ पाटील यांच्या उल्लेखनीय कामगिरीविषयी अधिक जाणून घेवू या.. या लेखाच्या माध्यमातून..
गिरीधर रघुनाथ पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी:
पोलीस पाटील म्हणून श्री.गिरीधर पाटील हे गेली सलग 27 वर्ष कार्यरत असून आजतागायत महसूल व गृह खात्याच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
पोलीस पाटील श्री.गिरीधर पाटील यांनी आजतागायत अपघाती व बेवारस 30 ते 35 मयत पंचनामे केले आहेत. त्यांनी वळ गावात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवली आहे. नारपोली पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात त्यांनी 302 मधील आरोपीचे हत्यार हस्तगत करण्यास सहकार्य केले. सन 2002 मध्ये वळ गावात साडेतीन लाखांची रिक्झीन पावडर (कार्बन पेपरसाठी वापरतात) मुद्देमालासह आरोपी पकडून गुन्हा नोंद केला. कोरोना काळात 2020 मध्ये मदत व सहकार्य करून गावात जनजागृती केली. वळ गावामध्ये 2023 मध्ये वर्धमान बिल्डींग अचानक कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. यावेळी बचावकार्यात तेथील रहिवाशांचे प्राण वाचविण्यासाठी मोलाचे मदतकार्य केले. त्यांनी ग्रामपंचायत, लोकसभा व विधानासभा सार्वत्रिक निवडणूक व इतर सहकारी संस्था निवडणूक कामात गावात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवली आहे. नारपोली पोलीस स्टेशन हद्दीत 304 गुन्ह्यामध्ये गोदाम परिसरात चोरी करणारे आळा घालण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. वळ ग्रामपंचायत परिसरात गावात दारुबंदी, गुन्हेगारी याबाबत जनजागृती केली.
पुरस्कार मिळाल्यानंतर श्री.गिरीधर पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, हा पुरस्कार माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. मी ही सेवा देशप्रेमाखातर केली आहे. मी केलेल्या उल्लेखनीय कार्याची शासनाने नोंद घेतल्याने मला हा पुरस्कार मा.राज्यपाल महोदयांकडून मिळाला आहे.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी व भिवंडी पोलीस निरीक्षक, ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील माझ्या पोलीस पाटील सहकाऱ्यांकडून मला मिळालेल्या सहकार्यामुळेच मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते पुरस्कार घेण्याचे भाग्य प्राप्त झाले. या सर्वांकडून मला मिळणाऱ्या सहकार्यामुळेच, प्रोत्साहनामुळेच माझ्यात शासकीय काम अधिक उत्साहाने करण्याची ऊर्जा निर्माण होत असते. याबद्दल सर्व संबंधित सहकारी, नातेवाईक व वळ ग्रामपंचायत परिवार व ठाणे जिल्ह्यातील शेकडो जनतेचे आभार मानतो.
पोलीस पाटील श्री.गिरीधर पाटील यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटलांना शासन नेहमी आपल्या पाठीशी असते, पोलीस पाटील हा गावचा कणा असून गावात शांतता व सुव्यवस्था राखणे, अवैध धंदे, बाल विवाह, तंटामुक्ती कामे, गावात शून्य गुन्हा नोंद याबाबत पोलीस पाटील नेहमी जागरूक राहणे आवश्यक आहे, आत्मनिर्धार बना, देशप्रेमाने भारून सतत चांगले काम करीत राहा, असे आवाहन केले आहे.



