खरीप हंगाम 2025 बीजप्रक्रिया मोहीम राबविण्यास सुरुवात
ठाणे, प्रतिनिधी) :- राज्यात सन 2024-25 पर्यंत बीजप्रक्रिया मोहीम क्षेत्रीय स्तरावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबविली जात होती. या मोहिमेस शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.मागील काही वर्षांचा अनुभव पाहता विविध प्रशिक्षणे, कृषी सप्ताह, शेतीशाळा, शेतकरी मेळावे, गाव बैठका इ. च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बीजप्रक्रिया मोहिमेचा अनुभव उत्साहवर्धक आहे.
जमिनीतून तसेच बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य / विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
या रोगांमुळे शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणावरील खर्च वाढून पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. तसेच पर्यायाने उत्पादनही घटत आहे. त्याकरिता बीजप्रक्रिया मोहिमेंतर्गत अशा शेतकऱ्यांना स्वतःकडील / घरगुती वापरण्यात येणाऱ्या बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यास प्रोत्साहित करून बीजप्रक्रियायुक्त बियाण्याची जास्त प्रमाणावर पेरणी करणे व बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य/विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीच्या प्रादुर्भावाला आळा घालणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
बीजप्रक्रिया करण्याचे फायदे :- 1. बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते. 2. जमिनीत असणाऱ्या किडींचा तसेच पेरणी पासून 30-35 दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. 3. कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते. 4. बियाण्याची उगवण क्षमता वाढवते. 5. जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जीवाणू झाडांना/पिकांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात. त्यामुळे झाडांची / पिकांची वाढ जोमाने होते. 6. उत्पादनात वाढ होते.
बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी :- 1. बीजप्रक्रिया करण्यासाठी हातमोजे, मास्क, चष्मा या सारख्या व इतर संरक्षण करणाऱ्या बाबीचा वापर करावा. 2. बीजप्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यावर किंवा सीड ड्रम / यंत्राद्वारे सावलीत करावी. 3. बियाणे हाताने चोळू नये, कापडाने किंवा पिशवी मध्ये एकत्र मिसळून घ्यावे. 4. रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया एकत्र करू नयेत. 5. बीजप्रक्रिया केलेले बियाणे 3-4 तासाच्या आत पेरणीसाठी वापरावे. 6. बीजप्रक्रिया बुरशीनाशक-किटकनाशक-जीवाणू अशा क्रमाने करावी.बीज प्रक्रियेसाठी लागणारी रासायनिक व जैविक औषधे तसेच जैविक खते याबाबतच्या शिफारस खालीलप्रमाणे आहेत. बियाण्याच्या वजनावरून खाली दिलेले कोणतेही एक बुरशीनाशक, किटकनाशक आणि जीवाणू त्या प्रमाणात घ्यावे.
पिकाचे नाव :- भात, कीड/रोगाचे नाव – अरगट, काणी, बीज प्रक्रिया शिफारस – 3 किलो मीठ 10 लीटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बी ओतावे व ढवळावे. द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळावे. तळाशी असलेले जड बी बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे.
कीड/रोगाचे नाव – बुरशीजन्य रोग, बीज प्रक्रिया शिफारस – 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बन्डाझिम ची बीजप्रक्रिया करावी.कीड/रोगाचे नाव – नत्र स्थिरीकरण व स्फुरद उपलब्धते साठी, बीज प्रक्रिया शिफारस – अॅझोटोबॅक्टर व स्फूरद विरघळवणारे जिवाणू (पी.एस.बी.) प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास चोळावे व अर्धा तास सावलीत सुकवावे, असे ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी कळविले आहे.