विशेष लेख -शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणार प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025
राज्य प्रतिनिधी-विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून “प्रधानमंत्री पीक विमा योजना” खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2024-25 मध्ये रु.1 प्रति अर्ज भरुन सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात आली. या कालावधीत राबविलेल्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर, त्यामध्ये सुधारणा करुन राज्य शासनाने सन 2025-26 या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे.या योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यात भात व नाचणी ही पिके अधिसूचित आहेत. भात व नाचणी पिकासाठी निर्धारित केलेल्या विमा हप्त्याचा शेतकरी हिस्सा अनुक्रमे रक्कम रु.457.50/- व रु.87.50/- एवढा विमा हप्ता भरून शेतकऱ्यास विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.
· नेसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.· शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन दणे.· कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास योजनेमुळे मदत होत आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:-1. ही योजना या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल.2. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.3. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.4. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल.5. या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल.6. योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK Farmer ID) असणे अनिवार्य असेल.7. पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई-पीक पाहणीअंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील.
जोखमीच्या बाबी:-या योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किवा पीक उत्पादनावर विपरीत : करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे / तांत्रिक उत्पादन आधारे, महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील.
विमा योजनेत सहभागी होण्याकरिता:-· अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजनेत भाग घेण्याच्या अंतिम दिनांकाआधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरण्याबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे.· इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला 7/12 चा उतारा, बँक पासबूक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून, हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोहोच पावती त्याने जपून ठेवावी.· कॉमन सर्विस सेंटर आपले सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागाची अंतिम मुदत दि.31 जुलै 2025 आहे.· योजना राबविणारी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी आहे.· ईमेल – pikvima@aicofindia.com
महत्त्वाच्या नवीन बाबी:-या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे, त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. शेतातील पीक आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास ई-पीक पाहणी मधील नोंद अंतिम धरण्यात येईल. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी मध्ये वेळेवर करावी.तरी, प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.रामेश्वर पाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाण
संपादन:मनोज सुमन शिवाजी सानप जिल्हा माहिती अधिकारी,ठाणे