vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुलांचे आयुष्य चांगले घडवा मी सोबत असेन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- सांगलीत वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात संपन्न- विविध सत्कार, स्पर्धांचे आयोजन

मुलांचे आयुष्य चांगले घडवा मी सोबत असेन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- सांगलीत वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात संपन्न- विविध सत्कार, स्पर्धांचे आयोजन

            सांगली : प्रतिनिधी -पहाटेपासून वाचकांना वृत्तपत्र उपलब्ध करून देत वाचकांचा चहा अधिक गोड करण्याचे काम आपण करता, त्याच पद्धतीने शासन दरबारी उपलब्ध असणाऱ्या विविध योजनांची माहिती लाभ मुलांना मिळवून देत त्यांच्या भविष्याची वाट चांगली करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या सोबत चांगला सूर्योदय पाहण्याचा आनंद मिळवा. मुलांना चांगलं शिकवण्यासाठी, घडवण्यासाठी व चांगलं अधिकारी बनवण्यासाठी सारथी, बारटी, महाज्योती अशा शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा लाभ घ्या, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना गरज पडेल तिथे मी तुमच्यासोबत असेन असे आश्वासन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेशी संलग्न असणाऱ्या सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त मुजमल मुजावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.       येथील वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री काकडे, सहाय्यक कामगार आयुक्त श्री मुजावर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. स्वागत संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सरगर यांनी केले तर प्रास्ताविक राज्य कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे यांनी केले. जिल्हा व राज्य संघटनेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती श्री चोपडे यांनी दिली.       यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, पहाटेच्या वेळी रस्त्यावर फक्त वृत्तपत्र विक्रेते दिसत असतात. समाज जागृतीचे साहित्य, विविध माहिती पोहोचवण्याची आपण काम करता. चहाची गोडी खऱ्या अर्थाने तुम्ही पोहचवत असलेल्या पेपर मुळे वाढते. पेपरला सुट्टी असेल तर अस्वस्थ वाटते. वृत्तपत्र विक्री हा अतिशय सन्मानाचा व्यवसाय आहे. यामधून वृत्तपत्र विक्रेते स्वतः घडले तसेच आपलं कुटुंब ही घडवत आहेत याचा अभिमान वाटतो. श्रमाची जोड असलेले व्यवसाय करणारे हात नेहमीच सुंदर असतात असे कौतुक केले. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सुद्धा आपल्या महाविद्यालयीन शिक्षण काळात वृत्तपत्र विक्री चे काम केले असल्याचे आवर्जून सांगितले.  श्री काकडे पुढे म्हणाले, आपल्या विविध मागण्या, अपेक्षा असू शकतात त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. मात्र जे उपलब्ध आहे त्या माध्यमातून स्वतःची प्रगती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मुलांचे भविष्य साकारताना सरकारने सुरू केलेल्या बारटी, सारथी व महाज्योती अशा विविध योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. या योजनांच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करत सरकार मुलांना घडवण्याचे काम करत आहे. याचा फायदा घ्या. या माध्यमातून मुलांचं आयुष्य घडवा. परिस्थिती नाही म्हणून शिकता आले नाही, मोठं होता आलं नाही अशी खंत ठेवू नका. मुलं हुशार असतात त्यांना मार्ग दाखवून द्या. मुलांच्या करिअरसाठी प्रगतीसाठी असणाऱ्या योजनांची माहिती मी स्वतः तुम्हाला देईन, त्यासाठी लागेल ती मदत करेन असे आश्वासन श्री काकडे यांनी दिले. वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या मुलांना आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवावे यासाठी विविध योजनांची सखोल माहीती देत मार्गदर्शन केले.    पाहुणे कामगार आयुक्त मुजमल मुजावर म्हणाले, वृत्तपत्र विक्री हा अतिशय कष्टाचा व्यवसाय आहे. थंडी, वारा व पाऊस याची तमा न बाळगता अखंडपणे हे काम करावे लागते व त्यामध्ये नियमितपणा ठेवणे हे सोपे नाही हे मी अनुभवले आहे मात्र आपण ते नियमीत करत आहात. असंघटित कामगार क्षेत्रातील घटकासाठी ई श्रम कार्ड सारख्या योजना सरकारने सुरू केले आहे, याचा लाभ आपण घ्यावा. याशिवाय इतरही योजनांचे लाभ सरकार देण्यासाठी प्रयत्नशील असून हे सर्व लाभ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करू.राज्य संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी सांगितले, वृत्तपत्र विक्रेत्यांना वाचकांकडून समाजामधून तसेच वृत्तपत्र व्यवस्थापनाकडून मानसन्मान मिळावा यासाठी संघटनेने काम केले आहे. वर्षातून एखादा दिवस स्वतःसाठी असावा यासाठीच महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पुढाकाराने 15 ऑक्टोबर 2018 पासून महाराष्ट्राचे संपूर्ण देशभरात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करत आहोत. वृत्तपत्र व्यवस्थापनाकडील मागण्यांसोबतच वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ व्हावे याकरिता शासन दरबारी सतत लढा देत आहोत. सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळ बैठकीत स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला मान्यता दिली आहे. मात्र अद्याप त्याची कार्यवाही सुरू झालेली नाही. ही कार्यवाही सुरू होणे गरजेचे आहे. कामगार आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित कामगार म्हणून नोंदणी करून या विविध योजनांचा लाभ थेट वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ही श्री विकास सूर्यवंशी यांनी केली.      राज्य संघटनेचे माजी कार्यकारणी सदस्य मारुती नवलाई यावेळी म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. देशातील पहिले वृत्तपत्र विक्रेता भवन सांगलीत उभे केले. त्याचबरोबर शासनाकडून ही विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. वृत्तपत्र क्षेत्रातील या महत्त्वाच्या घटकाला न्याय देण्याचे काम शासनाने करावे. संघटनेची माजी अध्यक्ष प्रशांत जगताप, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, ग्रामीण जिल्हा सचिव चंद्रकांत जोशी, वाळवा तालुका अध्यक्ष धनंजय राजहंस, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख हनुमंत जाधव आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व वृत्तपत्र व्यवस्थापनातील वितरण अधिकारी व पत्रकार उपस्थित होते. वृत्तपत्र विक्री सेवा सन्मान पुरस्काराने सन्मान   आयुष्यातील काही काळ वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम केलेल्या मात्र त्यानंतर नोकरीच्या ठिकाणी स्थिरस्थावर होत आयुष्यात चांगली प्रगती केलेल्या वृत्तपत्रक्षेत्रातील अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व, जाहिरात व्यवस्थापक उदय देशपांडे, विटा येथे वृत्तपत्र वितरणातील तिसरी पिढी म्हणून चांगले काम करत वृत्तपत्र वितरणाबरोबरच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनेत योगदान देणाऱ्या, विटा नगरपालिकेसह विटा शहर व तालुक्यातील विविध सामाजिक, सहकारी, शैक्षणिक संस्था, संघटनांमध्ये विविध पदांवर काम करणाऱ्या वृत्तपत्र एजंट विनय भंडारे, महाविद्यालयीन शिक्षण काळात अनेक वर्षे वृत्तपत्र टाकण्याचे काम करणाऱ्या व सध्या प्रथितयश शासकीय ठेकेदार म्हणून कार्यरत असणाऱ्या पृथ्वीराज पवार, वृत्तपत्र विक्रेता कामगार म्हणून काम करत असतानाच कॉपीचा व्यवसाय सुरू करून सांगली शहरात बायपास रोडवर प्रसिद्ध कॉपीवाला अशी ओळख निर्माण करत व्यवसायात यशस्वी झालेल्या सचिन आजूरकर, वृत्तपत्र विक्री व्यवसाय बरोबरच विविध सामाजिक संस्था संघटना कामात सहभाग असणारे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे, विविध सामाजिक संस्था संघटना यामध्ये कार्यरत असणारे वृत्तपत्र विक्रेते बाळासाहेब पोरे या सर्वांचा यावेळी जिल्हाधिकारी श्री काकडे यांच्या हस्ते व सहाय्यक कामगार आयुक्त श्री मुजावर यांच्या उपस्थितीत वृत्तपत्र विक्री सेवा सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. नाविन्यपूर्ण स्पर्धा उत्साहात   वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त संघटनेच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी चालू सायकल अथवा गाडीवरून पेपर अचूकपणे घरात अथवा घरातील खुर्चीवर टाकणे ही अचूक फेक तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त जाहिराती पेपरमध्ये भरणे या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील यशस्वी वृत्तपत्र विक्रेत्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.        कार्यक्रमाचे आभार विशाल रासनकर यांनी मानले तर सूत्रसंचालन वृत्तपत्र विक्रेते संजय कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे शहराध्यक्ष घोरपडे, मनपाक्षेत्राध्यक्ष दिपक वाघमारे,नागेश कोरे, कृष्णा जामदार,नारायण माळी,दरिबा बंडगर,प्रदीप आजगावकर, श्रीकांत दुधाळ,बाळासाहेब पोरे,गणेश कटगी,दीपक सूर्यवंशी, प्रताप दुधारे, प्रकाश कुंभार, सचिन माळी, प्रकाश उन्हाळे, बजरंग यमगर, अतुल रुपनर,सुरेश कांबळे,आर.एस.माने, निलेश कोष्टी, दादासो गुरव,बाळासाहेब पाटील, प्रशांत साळुंखे,बसाप्पा पट्टणशेट्टी, बंदेनवाज मुल्ला, सुरेश गायकवाड, बंडू आष्टेकर, यशवंत जाधव,महेश मुजूमदार, बजरंग कोळी, सुनिल कट्याप्पा, संजय कांबळे, अमोल कोरे, कैलास सूर्यवंशी, दत्ता चव्हाण,विशाल पवार,श्रीपती रासनकर आदींनी केले.

फोटो ओळी – सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त कार्यक्रमात वृत्तपत्र विक्री सेवा पुरस्काराने सन्मानित मान्यवरांसह जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त व संघटनेचे पदाधिकारी.

 

00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

अमृततर्फे मोफत ड्रोनपायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधीDGCA मान्यता प्राप्त प्रशिक्षणातून युवकांना नवे करिअर घडविण्याची संधी…

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी सुट्टीतही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांना मिळणार अध्ययनाचे धडे..

vishwatmaklokswamivarta

मान्सून कालावधीत यंत्रणांनी सज्ज राहावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*कृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी

महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध – महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे,बचतगट, सुरक्षा, कौशल्य विकास व सायबर साक्षरतेवर भर

नमुंमपा सर्वसाधारण सभेने मंजूर केला सन 2026-27 वर्षाचा 6904.43 कोटी रक्कमेचा नवी मुंबईच्या शाश्वत विकासाचा अर्थसंकल्प…