vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजाराचे वितरण शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

 कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजाराचे वितरण-शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, प्रतिनिधी : राज्यातील शेतकऱ्यांच्या अंगी कुशलता असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतमालाच्या उत्पादनात वाढ करीत आहेत; अशा प्रगतशील तंत्रज्ञान आणि त्यामाध्यमातून कृषीक्षेत्रात होणाऱ्या बदलाविषयी इतर शेतकऱ्यांनीही माहिती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमात श्री. पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण सन २०२५-२६ घटकाअंतर्गत निवड झालेल्या प्रातिनिधिक स्वरूपात ५१ लाभार्थ्यांना डि.बी.टी.द्वारे अनुदानावर ट्रॅक्टर व औजाराचे वितरण करण्यात आले.यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे, संचालक मंडळ, सभासद, विविध बँकेचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे (एआय) निर्णयप्रक्रिया डेटा आधारित असल्यामुळे अचूक होते, पिकातील दोष लवकर ओळखता येतात , त्यामुळे पिकाला लागणारे घटकांबाबत वेळेत माहिती मिळते. वीज आणि पाणी वापरात बचत होते, शेतमालाच्या उत्पादनातही वाढ होणार आहे, त्यामुळे वेगाने बदलणाऱ्या काळानुरुप शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, याकरीता राज्य शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने ३२ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही राज्यातील विविध भागात पाऊस पडत असून अशा भागातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरु करण्यात आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही मदत करण्याकरिता अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याकरिता कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती गठीत केली आहे. या समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारावर पुढची प्रक्रिया करून ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

बारामती तालुक्यातील सुमारे २५ हजार लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर करण्यात आली असून यावर्षी ३५ कोटी रुपयाचे अनुदान करण्यात येणार आहेत. याप्रमाणे राज्यातही अनुदान वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ तसेच विविध योजनांकरिता ५ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

राज्यातील विविध योजनेतील लाभार्थ्यांना सुमारे १ लाख कोटी रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या ३, ५ आणि ७.५ अश्वशक्ती असलेल्या कृषी पंपांसाठी वीज देयकाकरिता २५ हजार कोटी रुपये, पीएम-सन्मान निधी करिता ७.५ हजार कोटी रुपये, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरिता ४५ हजार कोटी रुपये, दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमाह अडीच हजार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमाह दीडहजार रुपये, ७५ वर्षांवरील नागरिक सर्व प्रकारच्या बसेसमध्ये १०० टक्के मोफत प्रवास, महिलांना बसेसमध्ये ५० टक्के सवलतीने प्रवास अशा विविध योजनांचा समावेश आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

शेतकरीहिताचे निर्णय घेण्यावर राज्य शासनाचा भर – कृषीमंत्री

श्री. भरणे म्हणाले, अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपये मदत करुण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल निर्णय घेतला आहे.

कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजारे मंजूर करुन त्यांचे वितरण करण्यात येत असून यामाध्यमातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होत आहे, एकूणच शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकरीहिताचे निर्णय घेण्यावर राज्यशासन भर देत आहे, असेही श्री. भरणे म्हणाले.

संबंधित पोस्ट

शबरी घरकुल योजनेतून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर देण्याचा निर्धार   — आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे-शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84 हजारहून अधिक अर्ज – भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद…

अखिल भारतीय धर्मसंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ संपन्न !प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात समस्त संत-महंतांची ,भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची एकमुखी मागणी !

vishwatmaklokswamivarta

देशभरातली बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात, मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी मोहिम उद्यापासून होणार सुरु -मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा.

vishwatmaklokswamivarta