vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमली पदार्थांबाबतची माहिती 112 या क्रमांकावर द्यावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा…

अमली पदार्थांबाबतची माहिती 112 या क्रमांकावर द्यावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा…

            सांगली, प्रतिनिधी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतील “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी कसोशीने प्रयत्न करावेत. अमली पदार्थांचे चक्र मोडणे ही सामूहिक जबाबदारी असून, हे उद्दिष्ट गाठण्यात नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे. अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अमली पदार्थ संदर्भात प्रभावी नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत नशामुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, बसस्थानक, रेल्वे स्थानक आदि ठिकाणी अमली पदार्थविरोधी जनजागृती फलक प्रदर्शित करावेत. दि. 18 नोव्हेंबर रोजी रेल्वे स्थानकावर पथनाट्य सादर करावे. ग्रामपंचायत बैठकीत याबाबत संकल्प करण्यासाठी प्रयत्न करावेत. कृषि विभागाने गांजा लागवड होत नसल्याबद्दल अहवाल सादर करावा. उद्योग विभाग, एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण विभागांनी कारखाने व बंद गोदामांची कसून तपासणी करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

अमली पदार्थविषयातील भविष्यकालिन संकट व धोके लक्षात घेऊन अमली पदार्थांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने व जाणिवपूर्वक पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिले.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतनसह जिल्ह्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयात नियमितपणे अमली पदार्थ विरोधी माहिती सांगावी. यासाठी एनएसएसच्या समन्वयाने स्वयंसेवकांना जबाबदारी नेमून द्यावी. वसतिगृहांना अचानक भेटी देऊन तपासणी करावी. रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या रेल्वेंवर विशेष नजर ठेवावी. गांजा व तत्सम पदार्थांची तस्करी होत नसल्याची वेळोवेळी खात्री करावी, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजचे डॉ. राजकिरण साळुंखे, शासकीय रूग्णालयाचे डॉ. विभीषण सारंगकर, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.: शासकीय व्यसनमुक्ती केंद्र ठरतेय आशेचा किरण“अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा” निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात व्यसनमुक्तीची चळवळ उभी केली आहे. प्रतिबंध, प्रबोधन आणि व्यसनमुक्ती उपचार हा त्रिसूत्री कार्यक्रम राबवून, अमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या संकल्पनेतून व प्रोत्साहनाने जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांपूर्वी मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मनोविकार विभागात व्यसनमुक्ती चिकित्सा, उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र जिल्ह्यातील व्यसनी रूग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

उपचारासाठी वाढता प्रतिसाद केंद्र सुरू झाल्यापासून महिन्याला सरासरी 100 रूग्ण बाह्यरूग्ण विभागात उपचार घेतात. त्यातील सरासरी 12 ते 15 रूग्ण आंतररूग्ण विभागात भरती होतात. दारूचे व्यसन, अमली पदार्थांचे व्यसनाशी संबंधित अनेक प्रकरणे केंद्रात येत आहेत. केंद्रात भरती झालेल्या रूग्णांनी घरी सोडल्यानंतर दर आठवडा किंवा 15 दिवसांनी फॉलो-अपसाठी बाह्यरुग्ण विभागाला भेट देणे अपेक्षित असते. उपचारात सातत्य ठेवल्यास सुधारणा जलद होते, असे तज्ज्ञ सांगतात.

अमली पदार्थ म्हणजे काय?अमली पदार्थांचे साधारणतः 1) ओपिओइड्स – ब्राऊन शुगर, हेरॉइन 2) सायकोस्टिम्युलंट्स – कोकेन, मेथाम्फेटामिन, एमडी 3) कॅनाबिस पदार्थ – गांजा, चरस 4) सिंथेटिक ड्रग्स – एलएसडी, एमडीएमए 5) स्निफिंग सोल्युशन – व्हाइटनर, गोंद इत्यादी 6) झोपेच्या गोळ्या – चुकीच्या वापरामुळे होणारे व्यसन

या व्यसनांमुळे मानसिक अस्थिरता, हिंसक प्रवृत्ती, नैराश्य, भास, भीती, आत्महत्येचे विचार यासारखी गंभीर लक्षणे निर्माण होतात. त्यामुळे त्वरित, तज्ज्ञांकडून आणि योग्य ठिकाणी उपचार घेणे अत्यावश्यक ठरते.

औषधोपचार + मानसोपचार = संपूर्ण उपचार या अमली पदार्थ व्यसनमुक्ती उपचार केंद्रामध्ये नातेवाईकासोबत राहून उपचार घेण्याची सोय आहे. यामध्ये औषधोपचार व मानसोपचार पद्धतीने उपचार केले जातात. मानसोपचार पद्धतीमध्ये विचार व वर्तन सुधारण्यासाठी सीबीटी म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी आणि रुग्णाला उपचारासाठी तयार करण्यासाठी मोटिव्हेशनल इंटरव्हिविंग पद्धतीने उपचार केले जातात. तसेच, गटचिकित्सा म्हणजेच समविचारी लोकांच्या साहाय्याने सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच, कुटुंबाला सोबत घेऊन उपचार करण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन (Family Therapy) केले जाते. ही सर्व उपचाररचना रुग्णाच्या पुनर्वसनात महत्त्वाची भूमिका बजावते.

अद्ययावत यंत्रसामग्रीने सज्ज,हे व्यसनमुक्ती केंद्र 6 प्रकारच्या अद्ययावत यंत्रसामग्रीने सज्ज करण्यात आले आहे. अमली पदार्थांमुळे भास, भ्रम, हिंसकपणा आत्महत्येचे विचार असे मानसिक आजार निर्माण होतात. त्यावर उपचार करण्यासाठी मॉडिफाइड इसीटी मशीन वापरण्यात येणार आहे. अमली पदार्थ आणि नशेच्या पदार्थांमुळे निर्माण होणारी भीती, घाबरटपणा, बेचैनी कमी करण्यासाठी मल्टी बिहेवियरल थेरपी’ मशीन वापरण्यात येणार आहे. अमली पदार्थ घेण्यासाठी निर्माण होणारी तल्लफ दूर करण्यासाठी अव्हर्जन थेरपी मशीनचा उपयोग केला जाणार आहे. उदासपणा आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी सेरेब्रल स्टिम्युलेशन मशीन आणि क्रॅनियल नर्व्ह स्टिम्युलेशन मशीन वापरण्यात येईल. तर व्यसनाची इच्छा कमी करण्यासाठी, मनामधील उदासपणा व घाबरटपणा दूर करण्यासाठी, उतावीळपणा घालवून स्थिरता आणण्यासाठी RTMS म्हणजेच रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन मशीनचा वापर करण्यात येईल.

इलेक्ट्रो कन्व्हल्जिव थेरपी,इलेक्ट्रो कन्व्हल्जिव थेरपी उपचारांमध्ये मेंदूच्या पेशींना विद्युत प्रवाहातर्फे उत्तेजित केले जाते. ही उपचार पद्धती व्यसनमुक्तीसाठी एक सहाय्यक उपचार पद्धती म्हणून अतिशय प्रभावकारी आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इ.सी.टी. अतिशय सुरक्षित आहे.

इलेक्ट्रो कन्व्हल्जिव थेरपी (इसीटी) मध्ये व्यक्तीला भूल देऊन मेंदूला अतिशय हलक्या विद्युत प्रवाहाने उत्तेजित केले जाते. ही मेंदूतील विशिष्ट भागांवर नियंत्रित विद्युत उत्तेजना देणारी वैद्यकीय प्रक्रिया आहे. व्यसनमुक्तीमध्ये याचा उद्देश प्रामुख्याने जड नैराश्य, चिंता, आत्महत्येचा धोका किंवा हे लक्षण कमी करणे हा असतो, कारण ही लक्षणे अनेकदा अमली पदार्थांच्या वापराबरोबर दिसतात आणि उपचारात अडथळा निर्माण करू शकतात.

इसीटी वापरल्यावर मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्सचे संतुलन सुधारते, मूड स्थिर होतो आणि उपचारांमध्ये सहभागी होण्याची क्षमता वाढते. विशेषतः जेव्हा पारंपरिक औषधे किंवा मानसोपचार प्रभावी होत नाहीत, तेव्हा इसीटी जलद परिणाम देते. यामुळे क्रेव्हिंग कमी होण्यास, नैराश्य कमी होऊन पुनर्वसन कार्यक्रमात सातत्य ठेवण्यास मदत होते. परंतु, व्यसनमुक्तीसाठी इसीटी हा प्राथमिक उपचार नाही. तो फक्त गंभीर मानसिक लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली वापरला जातो. थोड्या वेळासाठी स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो, पण तो साधारणतः परत सुधारतो. योग्य निवड, तपासणी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन असल्यास इसीटी हे व्यसनमुक्तीच्या व्यापक उपचारयोजनेतील एक सुरक्षित आणि प्रभावी पूरक साधन ठरू शकते.

महागडे उपचार विनाशुल्क,असे उपचार खाजगीरीत्या घेण्यासाठी साधारणतः 40 ते 50 हजार रूपये खर्च येतो. मात्र, या शासकीय व्यसननुक्ती केंद्रात विनामूल्य उपचार केले जाणार आहेत. व्यसन आजाराचे उपचार हे प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत विनाशुल्क होतो. जर रुग्णांकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर साधारणपणे तीन ते चार हजार रुपये खर्च येईल. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही व्यसनातून मुक्त होण्याची नवी आशा निर्माण झाली आहे

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कडक कारवाई – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

अग्निशमन दलाचे बळकटीकरण करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

vishwatmaklokswamivarta

मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेता, ०१.०३.२०२६ रोजी भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चालवलेल्या एकूण ३५० उड्डाणे रद्द 

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्यप्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत