vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बांधकाम साईटवरील कामगार सुरक्षा विषयक विशेष जागरुकता शिबीर संपन्न,बांधकाम कामगार सुरक्षेविषयी शिबीर आयोजित करणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका..

बांधकाम साईटवरील कामगार सुरक्षा विषयक विशेष जागरुकता शिबीर संपन्न,बांधकाम कामगार सुरक्षेविषयी शिबीर आयोजित करणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका..

 नवी मुंबई प्रतिनिधी-विकास होत असतांना पर्यावरण जपणुकीकडेही तितकेच लक्ष द्यायला हवे असे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये मजबूत बांधकाम, ग्रीन बिल्डिंग, जल सुरक्षा, ऊर्जा बचत याप्रमाणेच कामगार सुरक्षा हा महत्वाचा घटक असल्याचे सांगितले. एका बाजूला निवासयोग्य घरे उभारतांना ती घरे उभारणा-या बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचाविण्यासाठीही दक्ष रहायला हवे. पर्यावरण बदलाचा त्रास हा उघड्यावर काम करणा-या कामगारांना होत असल्याचे लक्षात घेऊन त्यादृष्टीने त्यांच्या कामाच्या वेळांचे नियोजन करावे तसेच त्यांना सर्व सुरक्षा साधने उपलब्ध करुन द्यावीत व ती त्यांनी वापरावीत यासाठीही प्रयत्न करावेत असेही आयुक्तांनी याप्रसंगी सांगितले.

          नवी मुंबई महानगरपालिका आणि क्रेडाई – बीएएनएम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांधकाम स्थळांवरील कामगार सुरक्षा जागरुकता शिबीर महापालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्रामध्ये आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे अशा प्रकारे बांधकाम कामगारांच्या सुरक्षेविषयी सर्वव्यापक शिबीर राबविणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे.

          याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, कामगार उपआयुक्त श्री. संभाजी व्हनाळकर, नमुंमपा शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, सहा.पोलीस निरीक्षक श्री. संदीप माने, नगररचनाकार श्री. युवराज चव्हाण, सहा.कामगार आयुक्त श्रीम. सारिका राऊत तसेच इतर अधिकारी व क्रेडाई बीएएनएमचे अध्यक्ष श्री. रसिक चौहान, सचिव श्री. जिगर त्रिवेदी, सह सचिव श्री. प्रतिक भद्रा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

          बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या अनेक योजना असून मोफत आरोग्य तपासणी, गृहउपयोगी वस्तू संच वितरण, अत्यावश्यक बाबींचे संच वाटप, सुरक्षा साधनांचा संच वितरण अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांची www.mahabocw.in या संकेतस्थळावर विनामूल्य नोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती देत कामगार उपआयुक्त श्री. संभाजी व्हनाळकर यांनी कामगारांच्या नोंदणीबाबत बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा असे सूचित केले. कामगारांच्या नोंदणीकरिता मागील वर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केलेले मालकाचे / ठेकेदाराचे प्रमाणपत्र आणि आधारकार्डची प्रत ही दोन कागदपत्रे महत्वाची असून 18 ते 60 वर्ष वयोगटातील नोंदीत बांधकाम कामगारांना व त्यांच्या शिकणा-या मुलांना लाभदायी अशा अनेक योजना शासनमार्फत राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

          सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांनी बांधकाम साईटवरील कामगारांची सुरक्षा या अत्यंत महत्वाच्या विषयावरील कार्यशाळेच्या आयोजनात सहभागी होणा-या सर्व संस्थांचे आभार व्यक्त करीत कामगार सुरक्षा नियमांचे पालन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यावसायिकांनी आपल्या साईटवरील कामगारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे त्यांनी सूचित केले.

          सहा.पोलीस निरीक्षक श्री.संदीप माने यांनी बांधकाम साईटवर एखादी दुर्घटना घडू नये म्हणून घ्यावयाच्या खबरदारीविषयी महत्वाच्या गोष्टी सांगत दुर्दैवाने दुर्घटना घडलीच तर करावयाच्या कार्यवाहीची विस्तृत माहिती दिली.

          याप्रसंगी ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलचे व्याख्याते श्री. रसिल कुमार यांनी कामगार सुरक्षा विषयक कायदे व घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपायोजना याविषयी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली.

          युनिकोचे श्री. उत्कर्ष शुक्ला यांनी बांधकाम साईटवर होणारे अपघात व त्याची कारणमीमांसा तसेच ते टाळण्यासाठी करावयाची पूर्वकार्यवाही या विषयी माहितीपूर्ण व्याख्यान दिले.

          क्रेडाई बीएएनएममार्फत श्री. जुबेन सगवई यांनी आभार प्रदर्शन केले तसेच व्यवस्थापक श्री.संतोष कदम यांनी शिबीर आयोजनात महत्वाची भूमिका बजावली.

          बांधकाम स्थळावरील कामगार सुरक्षा, पावसाळ्यातील उपाययोजना, बांधकाम स्थळाच्या आसपासची सार्वजनिक सुरक्षा, अपघात प्रतिबंधात्मक कार्यवाही व आपत्कालीन उपायोजनांची तयारी आणि कामगार कल्याण अशा विविध विषयांवर आयोजित या माहितीपूर्ण शिबीराच्या निमित्त अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, वास्तू विशारद, साईट इनचार्ज, सुरक्षाधिकारी, बांधकाम पर्यवेक्षक, कंत्राटदार, कंत्राटदारांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन· जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान..

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

vishwatmaklokswamivarta

उत्तरकाशी इथं झालेल्या ढगफुटीनंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, १३० जणांची सुटका.

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात काल ११२.७. मिमी पावसाची नोंद

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा