
जागतिक आदिवासी दिन विशेष..जंगलाच्या कुशीतून आकाशाकडे आदिवासी विद्यार्थ्यांची झेप…गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख-राष्ट्रपती भवन, संसद ते आयआयटी-विज्ञान केंद्र; शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर खुली होताहेत नव्या संधींची क्षितिजे*
राज्य प्रतिनिधी
ज्या आदिवासी मुला-मुलींसाठी कधीकाळी जिल्ह्याचे ठिकाण गाठणेही मोठी गोष्ट होती, त्याच दुर्गम आदिवासी भागातील नवी पिढी आज विमानाने दिल्ली-मुंबई, हैदराबाद आणि बंगलोर गाठत आहे. देशाच्या राष्ट्रपतींशी संवाद साधत आहे, संसद भवन पाहत आहे, आयआयटी, इस्रो आणि विज्ञान केंद्रांना भेट देत आहे, मंत्रालय-विधानभवनाची कार्यपद्धती समजून घेत आहे. आपल्या गावाच्या, जंगलाच्या आणि परिचित परिसराच्या पलीकडे संधींचे किती विशाल विश्व आहे, हे ती प्रत्यक्ष अनुभवत आहे.
गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागातील एका विद्यार्थ्याने राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर आत्मविश्वासाने उभे राहून, “मला शिक्षक व्हायचे आहे,” असे सांगणे हा या परिवर्तनाचा बोलका क्षण आहे. त्यावर राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि शिक्षण, मेहनत व चिकाटीच्या बळावर ती पूर्ण करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला
ही केवळ एका आदिवासी विद्यार्थ्याची गोष्ट नाही. ही आदिवासीबहुल गडचिरोलीच्या नव्या पिढीच्या बदलत्या आकांक्षांची गोष्ट आहे. आपल्या समृद्ध संस्कृतीची मुळे जपत शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक संधींच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जाणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या नव्या प्रवासाची ही सुरुवात आहे.
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवे आकाश*महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर वसलेला गडचिरोली हा आदिवासीबहुल, वनव्याप्त आणि प्रामुख्याने ग्रामीण जिल्हा. घनदाट जंगले, नद्या-नाले, विपुल वनसंपदा आणि समृद्ध आदिवासी संस्कृती ही या जिल्ह्याची ओळख आहे. मात्र भौगोलिक दुर्गमतेमुळे अनेक गावांतील नागरिकांचा मोठ्या शहरांशी प्रत्यक्ष संपर्क मर्यादित राहिला आहे. आजही दुर्गम भागातील अनेक नागरिकांनी जिल्हा मुख्यालय पाहिलेले नाही; नागपूर, मुंबई किंवा दिल्लीसारख्या महानगरांचा प्रत्यक्ष अनुभव तर अनेकांसाठी दूरची बाब आहे.
या भौगोलिक अंतरामुळे आदिवासी मुलांच्या गुणवत्तेला किंवा क्षमतेला मर्यादा नसल्या, तरी त्यांच्या अनुभवविश्वाला मर्यादा येऊ शकतात. हीच दरी कमी करण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दुर्गम व आदिवासी भागातील नव्या पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक ज्ञान आणि व्यापक अनुभवाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या व्यापक प्रयत्नांचाच एक भाग म्हणून विविध विभागांच्या माध्यमातून आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विमानाने देशातील महानगरांमध्ये शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्यात आली.



