तालुका : कन्नड माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव व सेवा संकल्प अभियानांतर्गत साथकुंड येथे माता-बालक आरोग्य तपासणी
कन्नड : प्रतिनिधी गीता माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव व सेवा संकल्प अभियानांतर्गत उपकेंद्र उंबरखेडा अंतर्गत साथकुंड येथे नियमित लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी गरोदर माता व लहान बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
ऊसतोडीसाठी स्थलांतरित होणाऱ्या गरोदर मातांना पुढील ३ ते ४ महिन्यांसाठी आवश्यक उपचाराच्या गोळ्या देण्यात आल्या. तसेच स्थलांतराच्या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये पुढील आरोग्य सेवा नियमितपणे घेण्याबाबत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भरत डी. नवले यांनी मार्गदर्शन केले. संबंधित गरोदर मातांचा नियमित पाठपुरावा करण्यासाठी आशा सेविकांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून फॉलोअप घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी गरोदर व स्तनदा मातांना सकस आहार, योग्य पोषण, आरोग्याची काळजी तसेच नियमित तपासणी याबाबत आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले.
या आरोग्य सत्रास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भरत डी. नवले, आरोग्य सेविका, आशा सेविका तसेच नागरिक उपस्थित होते.