vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छताकार्यासह मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कृती आराखडयाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून आढावा

स्वच्छताकार्यासह मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कृती आराखडयाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून आढावा

 

        नवी मुंबई प्रतिनिधी  स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने स्वच्छताविषयक सर्वच बाबींवर अधिक बारकाईेने काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांपासून मुख्यालय स्तरावरील विभागप्रमुखांपर्यंत सर्वांनी विभागांमध्ये प्रत्यक्ष जागांवर जाऊन पाहणी करावी व स्वच्छता सुधारणांवर भर दयावा असे सूचित केले. विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीप्रसंगी आयुक्तांनी स्वच्छता कार्याचा तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कृती आराखडयाचा व न्यायालयीन प्रकरणांचा तपशीलवार आढावा घेत गांभीर्यपूर्वक कार्यवाहीचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सु‍निल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड आणि सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

नवी मुंबईच्या स्वच्छतेमध्ये महानगरपालिकेच्या अखत्यारित नसलेल्या महामार्गांवरील स्वच्छतेचा तसेच रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेचा महत्वाचा भाग आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनवरील शौचालये व स्टेशन परिसराची स्वच्छता या अनुषंगाने सिडको महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही यावेळी आढावा बैठकीस पाचारण करण्यात आले होते. रेल्वे स्टेशनवरील स्वच्छतागृहांची स्थिती वापरण्यायोग्य व उत्तम असावी याकडे सिडकोमार्फत काटेकोर लक्ष दिले जावे असे यावेळी आयुक्तांनी निर्देशित केले. याबाबत महानगरपालिकेमार्फत सिडकोशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला असून त्याची तत्परतेने अंमलबजावणी करावी आणि तेथील शौचालयांमध्ये आवश्यक दुरुस्ती कामे करुन सुधारणा करावी व तेथे नियमित स्वच्छता राहील याची गांभीर्याने काळजी घ्यावी असे आयुक्तांमार्फत सिडको अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये हे आपले अंतिम उदि्दष्ट असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

 त्यासोबतच स्टेशन परिसराची सखोल स्वच्छता करावी, त्याठिकाणी रंगरंगोटी व सुशोभिकरण करावे, त्या परिसरातील धूळ खात उभी असलेली बेवारस वाहने हटवावीत आणि त्याठिकाणची मलनि:स्सारण वाहिन्यांवरील तुटलेली झाकणे त्वरित बदलून घ्यावीत असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. ही कामे करुन घेण्याकडे महानगरपालिकेचे संबंधित विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनी बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. याकामी सिडकोला काही मदत लागल्यास ही महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येईल असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाले बसू नयेत याबाबतही सिेडकोने अधिक कृतीशील व्हावे व त्या कामी आवश्यकता भासल्यास महानगरपालिकेच्या तेथील विभाग कार्यालयांची मदत घ्यावी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. रेल्वे स्टेशन परिसरातील बसस्टॉपच्या ठिकाणी असलेले खड्डे त्वरित भरुन घेऊन सुधारणा करावी असेही निर्देशित करण्यात आले

     महापालिका क्षेत्रातील 450 हून अधिक सार्वजनिक, सामुदायिक शौचालये यांच्या विदयमान स्थितीची पाहणी करण्याची जबाबदारी सर्व स्तरातील अभियंत्यांकडे दयावी व तीन दिवसात अहवाल घेऊन आवश्यक सुधारणा कामे तातडीने करावीत असे निर्देश आयुक्तांमार्फत अभियांत्रिकी विभागास देण्यात आले.

  या शौचालयांमध्ये होणारे दैनंदिन स्वच्छता काम यावर नियमीत लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ‘टॉयलेट सेवा ॲप’ सारखी आधुनिक यंत्रणा तयार करावी व त्यावर नियंत्रण राखण्याकडे दोन्ही परिमंडळांच्या उपायुक्तांनी बारकाईेने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी होणारी कार्यवाही अधिक प्रभावीपणे होण्याकडे व तेथील रेकॉर्ड अदययावत ठेवण्याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

 उदयाने सुस्थितीत राहण्याच्या दृष्टीनेही प्रमाण कार्यप्रणाली (SOP) तयार करावी तसेच ॲप तयार करावे जेणेकरुन उदयानामधील त्रुटी कळू शकतील व त्याचे निराकरण करणेही तत्परतेने शक्य होईल अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. रस्त्यांमधील दुभाजक तसेच रस्त्यांकडेच्या मोकळया जागा यांचे सुशोभिकरण काम अभियांत्रिकी विभागामार्फत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

  शहरात स्वच्छतेप्रमाणेच सुशोभिकरणावरही भर देऊन नागरिकांना व प्रवाशांना सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करावीशी वाटणार नाही अशाप्रकारचे सुंदर वातावरण तयार करण्यासाठी रंगरंगोटी करावी, शिल्पाकृती सुस्थितीत कराव्यात, कारंजे सुरु राहतील याची काळजी घ्यावी असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले,

   कचऱ्याचे घरातूनच ओला, सुका, घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण करणे अत्यंत आवश्यक असून याकरिता सर्व विभाग अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत सोसायटयांना व वसाहतींना भेटी दयाव्यात, तेथील नागरिकांशी संवाद साधावा, त्यांना कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दयावे व त्यांच्याकडून ते करवून घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले. अशाच प्रकारे महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांमधील विदयार्थ्यांमध्‍ये कचरा वर्गीकरणाचे महत्व प्रसारित करावे व त्यांच्या पालकांकडून ते करवून घेण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत असेही निर्देश आयुक्तांनी दिले.स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नागरिकांचे अभिप्राय (Citizen feedback) घेण्यास स्वच्छ भारत मिशनमार्फत सुरुवात झालेली असून त्यामध्ये जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांनी अभिप्राय नोंदवावेत यादृष्टीने नियोजन करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला असून त्यामधील सात कलमांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच विभागांमध्ये कार्यवाहीला प्रारंभ झालेला आहे. प्रत्येक विभागाने आपण करीत असलेल्या कार्यवाहीच्या नोंदी ठेवाव्यात व त्याची छायाचित्रे काढून ठेवावीत असेही निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती व छायाचित्रे महापालिका संकेतस्थळावर अपलोड करण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी न्यायालयीन प्रकरणांचाही आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीवर (Grievance Redressal) प्राप्त झालेल्या तक्रार निवारणाचा विभागवार आढावा घेताना तक्रारींचे विहित कालावधीत तत्परतेने निवारण करण्यावर अधिक काटेकोर लक्ष दयावे व ‘शून्य प्रलंबितता’ प्रभावीपणे राबवावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.

000000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणासाठीसोडत (दि. 7) जुलैला जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबईत आगमन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांनी स्वागत केले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईच्या महापौरपदी श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौरपदी श्री.दशरथ भगत विराजमान…

vishwatmaklokswamivarta

नव्या काळातील बदल स्वीकारणारी पिढी ‘एमकेसीएल’ने घडवावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम