
अनंत चतुर्दशीदिनीच्या पार्श्वभूमीवर सज्ज विसर्जन स्थळांची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी
नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला अत्यंत उत्तम प्रतिसाद दिल्याने नवी मुंबईतील गणेशोत्सव अत्यंत आनंदात साजरा झाला असून यापूर्वीच्या विसर्जन दिवसाप्रमाणेच अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठया मूर्ती विसर्जनासाठी येत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वच विसर्जन स्थळांवर आवश्यक सर्व व्यवस्था चोख ठेवली असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
अनंत चतुर्थी चतुर्दशी दिनी मोठ्या प्रमाणात होणा-या श्रीमूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने आयुक्तांनी विसर्जन स्थळांवरील व्यवस्थेची पाहणी करताना माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. यावेळी शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, उपआयुक्त श्री.संजय शिंदे तसेच संबंधित विभागांचे सहा.आयुक्त व कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे व 156 इतक्या मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळांवर आवश्यक सर्व व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. मागील 5 विसर्जन दिवसांमध्ये 36 हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन नागरिकांच्या सहयोगामुळे सुयोग्य पध्दतीने झाले असून अनंत चतुर्दशीच्या अखेरच्या दिवसाचे विसर्जनही गणरायाच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक मंडळांच्या आकाराने मोठ्या मूर्ती विसर्जित होत असल्याने सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनाकरिता मध्यम व मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिफ्ट / क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोपरखैरणे से-19 येथील धारण तलावावर अत्याधुनिक यांत्रिकी तराफ्याची व्यवस्था करण्यात आली असून आकाराने मोठया श्रीमूर्ती विसर्जनासाठी या यांत्रिकी तराफ्याचा श्रम व वेळ वाचण्यात मोठया प्रमाणात उपयोग होत आहे. या अनुषंगाने वाशी, कोपरखैरणे, रबाळे तलावांवरील विसर्जन व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.
विर्सजन सोहळा सुरळीतपणे पार पडण्यासाठी व नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी मोठया प्रमाणात स्वयंसेवक व लाईफगार्डस त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यतत्पर राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. विसर्जनस्थळी जमा होणा-या फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मिती तसेच खतनिर्मिती केली जात असून याकामी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांचे मोठे योगदान लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांकडून मिळणा-या उत्तम सहयोगामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवातील आत्तापर्यंतचे श्रीमूर्ती विसर्जन चांगल्या रितीने पार पडले असून उद्या अनंतचतुर्दशीदिनीही नागरिक आपल्या 6 फूटांपर्यंतच्या उंच श्रीमूर्ती मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या नजिकच्या कृत्रिम तलावातच विसर्जन करतील व आपल्या नवी मुंबईचा पर्यावरणशील शहर हा नावलौकिक वाढवतील असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
0000



