ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध स्पर्धा उपक्रम उत्साहात संपन्न
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली आदराची व आपुलकीची भावना अभिव्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दि. ०१ ऑक्टोबर, २०२६ रोजी जागतिक “ज्येष्ठ नागरिक दिन” साजरा करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून ज्येष्ठांच्या विविध अंगभूत कला-क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्याकरिता वेगवेगळ्या स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रायोगिक स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्साही सहभाग घेत सर्वच स्पर्धा उपक्रम यशस्वी केले. यामध्ये कथाकथन स्पर्धा – ३८ स्पर्धक, हास्य स्पर्धा – २३ स्पर्धक, वेशभूषा स्पर्धा – १९ स्पर्धक, नृत्य स्पर्धा (एकेरी) – १८ स्पर्धक, टेलिफोन स्पर्धा – २२ स्पर्धक, एकपात्री अभिनय स्पर्धा – २७ स्पर्धक, गायन स्पर्धा (एकेरी) – ६२ स्पर्धक, गायन स्पर्धा (कराओके) – १६ स्पर्धक, काव्यवाचन स्पर्धा – ४३ स्पर्धक – अशा प्रकारे दोन दिवसात ३५४ ज्येष्ठ नागरिक स्पर्धक यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला.
याच स्पर्धा उपक्रमांतर्गत महात्मा फुले भवन, से-३, वाशी या ठिकाणी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न होत असून कॅरम स्पर्धेमध्ये १३९ व बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ३६ ज्येष्ठांनी नोंदणी केलेली आहे. या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या विशेष समारंभात विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. तरी विशेषत्वाने नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांनी व सर्वच नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.