
ठाणे येथे 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन;नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन
ठाणे, प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रलंबित व दाखल पूर्व प्रकरणांचा वेगाने व सामोपचाराने निपटारा व्हावा, या उद्देशाने येत्या शनिवारी, दिनांक 12 डिसेंबर 2026 रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ आयोजित करण्यात आली आहे. मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रविंद्र एस. पाजणकर यांनी नागरिकांना या राष्ट्रीय उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
दाखल पूर्व व प्रलंबित प्रकरणांची सुनावणी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची (Pre-Litigation) तसेच प्रलंबित असलेली विविध प्रकरणे सुनावणीसाठी ठेवली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने धनादेश अनादर प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली, कामगार वाद, कर वसुली, विद्युत व पाणी देयक विषयक वाद, वैवाहिक व इतर दिवाणी दाव्यांचा समावेश आहे. याशिवाय न्यायालयातील प्रलंबित आपसातील तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भूसंपादन, महसूल प्रकरणे, सेवा विषयक (पगार, भत्ते व सेवानिवृत्तीचे फायदे) प्रकरणे आणि भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकूम व कराराची पूर्तता यांसारखे दिवाणी वादही लोकअदालतीसमोर ठेवता येतील.
वेळ, पैशांची बचत आणि कोर्ट फी परतावा लोकअदालतीचे महत्त्व विशद करताना न्या. रविंद्र एस. पाजणकर यांनी सांगितले की, लोकअदालतीत होणारा निवाडा हा दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीने व समजुतीने होत असल्याने यामध्ये कोणाचीही हार अथवा जीत होत नाही. यामुळे दोन्ही पक्षांमधील द्वेष व कटुता निर्माण न होता संबंध सौहार्दपूर्ण राहतात. तसेच दीर्घ युक्तिवाद, साक्षी पुरावे व उलटतपासणी या बाबी टाळल्या गेल्याने वेळेची आणि पैशांची मोठी बचत होते. लोकअदालतीत होणाऱ्या निवाड्याविरुद्ध कुठेही अपील नसून एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका मिळते. या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणेच केली जाते आणि प्रकरणाचा निकाल लागल्यास कायद्यानुसार भरलेली कोर्ट फी देखील परत मिळते.
कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन यापूर्वी ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतींना पक्षकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आगामी १२ डिसेंबर २०२६ रोजी ठाणे जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये होणाऱ्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपली प्रकरणे ठेवण्यासाठी संबंधित तालुक्यातील तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे करण्यात आले आहे.
00000



