अध्यात्मिक वार्ता- विद्येची देवता, विघ्नांचा हर्ता, ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सगळीकडेच जय्यत तयारी चालू आहे. डेकोरेशन, आरास, मूर्ती, साफसफाई आदी गोष्टी शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. आता कधी ७ सप्टेंबरचा दिवस उजाडतो आणि कधी सगळ्यांचा लाडका बाप्पा आपल्या घरी विराजमान होतो असे सर्वांना झाले आहे.
गणपती बाप्पा आल्यानंतर त्यांची सेवा आणि पूजा करण्यातच आपला वेळ सर्व जणं खर्चिक करतील. या गणेश चतुर्थीला किंवा जेवढे दिवस गणपती घरी आहे तेवढे दिवस किंवा वर्षभर, विशिष्ट खास दिवशी तुम्ही गणपती अथर्वशीर्ष नक्की म्हणा. येत नसेल तर वाचून वाचून म्हणा, इंटरनेटवर लावा पण अथर्वशीर्ष नक्की वाचा. कारण गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र हे सर्व अथर्वशीर्षांचे शिरोमणी असल्याचे मानले जाते, त्याचे वर्णन अथर्ववेदात आढळते. गणेश अथर्वशीर्ष हे पार्वती नंदन गणेशाला समर्पित करण्यात आले आहे.
अथर्वशीर्षाचे पठण कोणत्याही बुधवारी, चतुर्थी तिथी किंवा शुभ मुहूर्तावर सुरू करावे, गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी या गणपती अथर्वशीर्षाचे पठण सर्वात शुभ आणि लाभदायक मानले गेले आहे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे अथर्व ऋषी यांनी लिहिले होते ज्यांना गणपतीचे दर्शन झाले होते. कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे नामस्मरण करण्याची प्रथा आहे. चला जाणून घेऊया अथर्वशीर्षाबद्दल अधिक माहिती.
अथर्वशीर्ष हे एक उपनिषद असून ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. अथर्वशीर्षामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला खास महत्व आहे. अथर्वशीर्षाची फोड करत अर्थ लावला तर थर्व म्हणजे चंचल, अथर्व म्हणजे स्थिर तर शीर्ष म्हणजे मस्तक असा होतो. अर्थात ज्याच्या पठणामुळे मनुष्याच्या बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय.
अथर्वशीर्षाच्या सुरुवातीला गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगितली गेली असून, शेवटी गणपती परब्रह्म आहे असे सांगितले आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल, असे म्हटले आहे.
गणपती अथर्वशीर्ष पठण करताना काही नियम
* उच्चार अगदी स्पष्ट असावे.
* अथर्वशीर्ष एकाच गतीने अतिशय हळू बोलला पाहिजे.
* अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
* अथर्वशीर्ष अर्थपूर्णरीत्या पठण केले पाहिजे.
* अथर्वशीर्ष एकापेक्षा जास्त वेळा म्हणावे लागेल तेव्हा ‘वरदमूर्तये नमः’. इथपर्यंत वाचावे. त्यानंतर वटच्या आवर्तनानंतर पठण करावे.
* अथर्वशीर्षापूर्वी दिलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीला एकदाच उच्चारावा.
* गणेश अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे अभिषेक.* गणेश अथर्वशीर्षाचे पठण करताना धूतशास्त्र, मृगजीन, धबली किंवा दर्भ चटई वापरावी.* अथर्वशीर्ष पठण करताना मांडी बदलणार नाही याची काळजी घ्यावी.
* दक्षिण दिशेशिवाय इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.* अथर्वशीर्ष पाठ करण्यापूर्वी गुरूंना तसेच ज्येष्ठांना नमस्कार करावा.* अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून अक्षता, दुर्वा, शमी आणि लाल फुले वाहावीत.
* पूजा करणे शक्य नसेल तर गणपतीच्या मनःस्थितीचे ध्यान करावे, नमस्कार करावा.
गणपती अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे* गणपती अथर्वशीर्षाचे पठण केल्याने आपल्याला हे सर्व फायदे मिळतात-* गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याने जीवनात सर्वांगीण प्रगती होते.* गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते.* आर्थिक समस्येमध्ये हळूहळू परंतु स्थिरपणे आर्थिक समृद्धी येते.* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतात.* विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात.* गणपतीची कृपा जाणवू लागते.* सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात.
त्याशिवाय मुलांना आणि तरुणांना अभ्यासात रस नसेल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना रोज नियमितपणे अथर्वशीर्ष पाठ करण्यास सांगितलं जातं.संग्रहक – वे.श्री.ईश्वर स्वामी होळीमठ (ज्योतिष शास्त्री) सोलापुर.