vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमधील बंगळूरु इथे सुमारे 22,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमधील  बंगळूरु इथे सुमारे 22,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी…

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमधील बंगळूरु इथे सुमारे 22,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,ऑपरेशन सिंदूरचे यश, सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्याचे सामर्थ्य आणि दहशतवाद्यांना पाठबळ पुरवणाऱ्या पाकिस्तानला काही तासांमध्ये गुडघे टेकायला लावण्याची क्षमता, हे भारताचे नवे रूप संपूर्ण जगाने पाहिले आहे : पंतप्रधान आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था आहे : पंतप्रधान

गेल्या 11 वर्षांमध्ये आपली अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरून पहिल्या पाचमध्ये पोहोचली, आता आपण आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकमध्ये बंगळूरु इथे सुमारे 7,160 कोटी रुपये खर्चाच्या बंगळूरु मेट्रोच्या यलो लाइनचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 15,610 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बंगळूरु मेट्रो टप्पा -3 प्रकल्पाची पायाभरणीही केली. यासोबतच त्यांनी के.एस.आर. रेल्वे स्थानकावर तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडाही दाखवला.

यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. कर्नाटकच्या भूमीवर पाऊल ठेवताच आपल्याला आपलेपणा जाणवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कर्नाटकाची समृद्ध संस्कृती, इथल्या लोकांचे प्रेम आणि मनाला स्पर्श करणारी कन्नड भाषेची गोडी, याचा उल्लेखही त्यांनी आपल्या संबोधनात केला. आपल्या संबोधनाला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूरुची अधिष्ठात्री देवी अण्णम्मा तायी यांच्या चरणी वंदनही केले. शतकांपूर्वी नाद प्रभू केम्पेगौडा यांनी बंगळूरु शहराचा पाया रचला होता, याचे स्मरण त्यांनी करून दिले. केम्पेगौडा यांनी परंपरांशी जोडलेल्या आणि प्रगतीची नवी उंची गाठणाऱ्या शहराची कल्पना मांडली होती, असे पंतप्रधानांनी सांगितले. या विचारांचा आत्मा बंगळूरुने कायमच जगला आणि जपला आहे, आणि आज बंगळूरु तेच स्वप्न साकार करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

आज उदयाला येत असलेले बंगळूरु हे शहर नव्या भारताच्या उदयाचे प्रतीक बनले असल्याचे ते म्हणाले. बंगळुरू शहराच्या अंतरंगात तत्वज्ञानाचा दृष्टीकोन असल्याचे ते म्हणाले. या शहरातल्या प्रत्येक घडामोडीत तांत्रिक कौशल्य दिसून येते. बंगळूरुने भारताला माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नकाशावर अभिमानाचे स्थान मिळवून दिले आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केले. बंगळूरुच्या यशाचे श्रेय इथल्या लोकांचे कठोर परिश्रम आणि त्यांच्यातल्या प्रतिभेचे आहे असे ते म्हणाले.

21 व्या शतकात, शहर नियोजन आणि शहर पायाभूत सुविधा या आपल्या प्रत्येक शहरांच्या महत्त्वाच्या गरजा असल्याची बाब पंतप्रधानांनी नमूद केली. त्या अनुषंगानेच बंगळूरुसारख्या शहरांनी भविष्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने बंगळूरुसाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले असून, आज या मोहिमेला नवी गती मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या या भेटीत पंतप्रधानांनी बंगळूरु मेट्रोच्या यलो लाइनचे उद्घाटन केले तसेच मेट्रो फेज-3 ची पायाभरणीही केली. देशाच्या वेगवेगळ्या भागांना जोडणाऱ्या तीन नव्या वंदे भारत गाड्यांनाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. बंगळूरु आणि बेळगावी दरम्यान वंदे भारत सेवा सुरू झाल्याने बेळगावीमधील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याव्यतिरिक्त, नागपूर आणि पुणे, तसेच श्री माता वैष्णो देवी कटरा आणि अमृतसर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या रेल्वे सेवांचा लाखो भाविकांना फायदा होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल असे ते म्हणाले. या प्रकल्पांसाठी आणि नवीन वंदे भारत गाड्यांसाठी त्यांनी बंगळूरु, कर्नाटक आणि संपूर्ण देशातील जनतेचे अभिनंदनही केले.

ऑपरेशन सिंदूरनंतर आपली बंगळूरुची ही पहिलीच भेट असल्याचे त्यांनी नमूद केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय संरक्षण दलांनी मिळवलेले यशही त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. सीमेपलीकडे दूरवर असलेले दहशतवाद्यांचे तळ तिथपर्यंत पोहचून नष्ट करण्याची भारताच्या संरक्षण क्षमताही त्यांनी अधोरेखित केली. दहशतवाद्यांना पाठबळ पुरवणाऱ्या पाकिस्तानला काही तासांत गुडघे टेकायला लावण्याच्या भारताच्या क्षमतेबद्दल त्यांनी उपस्थितांना सांगितले. आत्ताच्या नवीन भारताचे हे नवे रूप संपूर्ण जगाने पाहिले आहे असे ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे श्रेय हे तंत्रज्ञानाची ताकद आणि संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडियाच्या सामर्थ्याचे आहे असे त्यांनी सांगितले. या यशात बंगळूरु आणि कर्नाटकातील तरुणांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी केला तसेच, या यशातील भूमिकेबद्दल सर्वांचे अभिनंदनही केले.

आता जगातील प्रमुख शहरांच्या यादीत बंगळूरुची दखल घेतली जात असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. भारताने जागतिक स्तरावर केवळ स्पर्धाच नव्हे, तर नेतृत्वही केले पाहिजे असे ते म्हणाले. आपली शहरे स्मार्ट, वेगवान आणि कार्यक्षम असतील, तरच प्रगती साध्य करता येईल ही बाबही त्यांनी नमूद केली. आधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकारचा मोठा भर असल्याचे त्यांनी सांगितले. आर.व्ही. रोड ते बोम्मसंद्रा दरम्यानच्या बंगळूरु मेट्रोच्या यलो लाइनची सुरुवात झाल्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली. या मेट्रो रेल्वे मार्गिकेमुळे बंगळूरुमधील अनेक महत्त्वाचे भाग परस्परांशी जोडले जातील. बासवनागुडी आणि इलेक्ट्रॉनिक सिटी दरम्यान प्रवासाच्या वेळेतही आता मोठी बचत होईल, यामुळे लाखो लोकांचे जगणे आणि काम करणे सुलभ होईल असे ते म्हणाले.यलो लाइनच्या उद्घाटनाच्या बरोबरीनेच बंगळूरु मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याची – अर्थात ऑरेंज लाइनची – पायाभरणीही झाली असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. ही ऑरेंज लाइन सुरू झाल्यावर, यलो लाइनसोबत मिळून दररोज 25 लाख प्रवाशांना प्रवासाची सोय उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे बंगळूरुची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि नवी उंची गाठेल असे ते म्हणाले. बंगळूरु मेट्रो रेल्वे सेवेने देशात सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकासाच्या संदर्भात एक नवीन आदर्श निर्माण केला असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. इन्फोसिस फाऊंडेशन, बायोकॉन आणि डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या कंपन्यांनी अनेक महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांसाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही पंतप्रधानांनी केला. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी अर्थात CSR चा अशा रितीने झालेला उपयोग प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित करून या योगदानाबद्दल त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राचे अभिनंदनही केले.

भारत हा सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था आहे. गेल्या अकरा वर्षांत, जागतिक पटलावर भारताची अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरून पहिल्या पाचमध्ये पोहोचली आहे आणि आता पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. Reform, Perform and Transform या भावनेतून, सुस्पष्ट उद्दिष्टे आणि प्रामाणिक प्रयत्नांसह केल्या जात असलेल्या सुधारणांमुळेच ही गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांची प्रगती आणि विस्ताराबद्दलही पंतप्रधानांनी उपस्थितांना माहिती दिली. 2014 मध्ये मेट्रो सेवाचा विस्तार फक्त पाच शहरांपुरता मर्यादित होता, मात्र आज, 24 शहरांमध्ये 1,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे पसरले आहे, आणि यामुळे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठे मेट्रो जाळ्याचा विस्तार असलेला देश बनला आहे, असे त्यांनी सांगितले. 2014 पूर्वी, देशात केवळ 20,000 किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले होते, मात्र गेल्या अकरा वर्षांत तब्बल 40,000 किलोमीटरपेक्षा जास्त रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले असून, ही शाश्वत वाहतूक विकासाच्या प्रक्रियेतली एक मोठी झेप असल्याचे ते म्हणाले.

आता भारताचे यश केवळ जमिनीपुरते मर्यादित राहिले नसून ते गगनात देखील भरारी घेत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. 2014 मध्ये भारतात केवळ 74 विमानतळ होते, आणि आज ही संख्या 160 पेक्षा जास्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जलमार्गांशी संबंधित पायाभूत सुविधांमध्येही मोठी प्रगती झाली असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. देशात 2014 मध्ये फक्त तीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यरत होते, आता ही संख्या आता तीसवर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

नमुंमपा सर्वसाधारण सभेने मंजूर केला सन 2026-27 वर्षाचा 6904.43 कोटी रक्कमेचा नवी मुंबईच्या शाश्वत विकासाचा अर्थसंकल्प…

मुंबई – पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक सुरळीत सुरू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा-22 वा हप्ता होणार 13 मार्चला वितरित,राज्यातील 91 लाख शेतकरी कुटुबांना 1,837 कोटी रुपयांचा लाभसमारोहचे थेट प्रक्षेपन https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध

नैसर्गिक आपत्तीबाधित शेतकऱ्यांसाठी 121 कोटींच्या मदत निधीस मंजूरी- आतापर्यंत 219 कोटी 70 लाख रुपयांची मदत- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स निवडचाचणी १४ मे रोजी