vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगपालिकेची मालमत्ता कर वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ८७६ कोटींचा कर वसूल…

नवी मुंबई महानगपालिकेची मालमत्ता कर वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ८७६ कोटींचा कर वसूल…

      नवी मुंबई प्रतिनिधी-    नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ८७६ कोटींचा मालमत्ता कराची विक्रमी वसुली करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून एका आर्थिक वर्षात वसूल केलेला हा सर्वात जास्त मालमत्ता कर आहे. शहरातील करदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद, १० मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या काळातील अभय योजना आणि महापालिकेच्या नियोजनबद्ध वसुली मोहिमेमुळे ही कामगिरी शक्य झाली असून कर भरणाऱ्या नागरिकांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व करदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

          या ऐतिहासिक कामगिरीमागे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे प्रभावी नेतृत्व, दूरदृष्टी आणि प्रशासनातील काटेकोर नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. कर वसुली प्रक्रियेत पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि नागरिकांपर्यंत पोहोचणारी कार्यपद्धती यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे करदात्यांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, त्याचा सकारात्मक परिणाम गेल्या दोन वर्षांपासून मालमत्ता कर वसुलीमध्ये दिसत आहे. यंदा मालमत्ता कराची विक्रमी वसुली साध्य झाली आहे.

          महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यावर्षी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या अधिपत्याखाली कर वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यासोबतच, कर भरण्याबाबत एसएमएस, नोटीस, व्हॉट्सअप मेसेज व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने वसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली. तसेच नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना मार्च २०२६ मध्ये साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कर भरणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेची कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती.

          नवी मुंबई महानगरपालिकेकडून १० मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकबाकीदारांना दिलासा देत कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शास्तीवर ५० टक्के सवलत देण्यात आली होती.

         मालमत्ता कर विभागाने मालमत्ताधारकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या सर्व सुविधांमुळे यंदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता करामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८७६ कोटींची वसुली करण्यात आली आहे.

          या विक्रमी कामगिरीबद्दल महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

……….नेरूळ प्रभागातून सर्वात जास्त वसुली

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १ एप्रिल २०२५ पासून ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत नेरूळ प्रभागातून सर्वात जास्त वसुली झाली आहे. या कालावधीत या कार्यालयाने १८२ कोटी ०९ लाख रुपयांची वसुली केली आहे. तर, कोपरखैराणे प्रभागातून १६३ कोटी ४० लाख रुपये, घणसोली प्रभागातून १५० कोटी ११ लाख रुपये अशी वसुली झाली आहे.

……डेटा विश्लेषण प्रणालीचा वापर,नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील मालमत्ताधारकांचे डेटा आधारित सखोल विश्लेषण करून नियोजनबद्ध वसुली मोहीम राबवली होती. डेटा विश्लेषण केल्यानंतर त्यानुसार मालमत्ताधारकांमध्ये मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी एसएमएस, सामाजिक माध्यमे, व्हॉट्सअप मेसेज, आरसीएस एसएमएस प्रणाली यांचा प्रभावी वापर करण्यात आला. ज्याचा सकारात्मक परिणाम वसुलीवर दिसून आला आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॉलिंग प्रणाली वापरून थकबाकीदारांशी संपर्क साधून वेळोवेळी मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन करण्यात आले.

…..ऑनलाईन कर भरण्यास पसंती,नवी मुंबई शहरातील मालमत्ताधारकांसाठी आठही विभाग कार्यालयांमध्ये कर संकलन केंद्रांत प्रत्यक्ष कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीनेही मालमत्ता कर भरण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली होती. या सुविधेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ता कर भरलेल्या २ लाख २५ हजार ५७६ मालमत्ताधारकांपैकी जवळपास ६१ टक्के मालमत्ताधारकांनी ऑनलाईन तर ३९ टक्के मालमत्ताधारकांनी ऑफलाईन कर भरला आहे

………*मालमत्ता कर वसुलीची ठळक वैशिष्ट्ये* : • आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ८७६ कोटींची विक्रमी वसुली • नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील एका वर्षातील सर्वाधिक कर वसुली • नेरूळ प्रभागातून सर्वाधिक १८२ कोटी ०९ लाख रुपयांची वसुली • कोपरखैरणे, घणसोली व तुर्भे प्रभागांचाही वसुलीत लक्षणीय वाटा • ऑनलाईन कर भरण्यास नागरिकांची पसंती. एकूण ६१ टक्के करदात्यांनी डिजिटल पद्धतीचा वापर करीत भरला मालमत्ता कर • आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २ लाख २५ हजार ५७६ मालमत्ताधारकांनी कर भरला असून कर भरण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

 • मार्च २०२६ मध्ये २८ हजार ८११ मालमत्ताधारकांनी तब्बल १९२ कोटी ८१ लाख ३७ लाख ३३५ रुपयांची वसुली झाली आहे. • डेटा विश्लेषणावर आधारित नियोजनबद्ध वसुली मोहीम यशस्वी • एसएमएस, व्हॉट्सअॅप, आरसीएस संदेशाद्वारे सतत जनजागृती व पाठपुरावा • सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्रे सुरू ठेवून नागरिकांना सुलभ सुविधा • नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत सकारात्मक व जबाबदार दृष्टिकोन निर्माण करण्यात यश • कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॉलिंग प्रणाली वापरून थकबाकीदारांशी संपर्क

00000

 

संबंधित पोस्ट

लोकसंस्कृतीचे विपुल लेखन करणाऱ्या- -ताराबाई भवाळकर..

vishwatmaklokswamivarta

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये-: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन• *नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन*• *शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-१ चा प्रारंभनागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात येणाऱ्या स्थलांतरित मजुरांवर निर्बंध घालण्यासाठी सक्षम कायदा करावा.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मनुष्यबळाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाने केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta