vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विविध नागरी सुविधांची व नालेसफाईची नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून प्रत्यक्ष पाहणी

विविध नागरी सुविधांची व नालेसफाईची नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून प्रत्यक्ष पाहणी

 

      नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे गतीने सुरु असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विविध नागरी सुविधा कामे व प्रकल्पांची पाहणी करताना कोपरी व सेक्टर 17 वाशी येथील नालेसफाई कामांची पाहणी करीत काढलेला गाळ काहीसा सुकल्यानंतर लगेच उचलून नेण्याचे निर्देश दिले. महानगरपालिकेच्या वतीने नैसर्गिक नालेसफाई करताना प्रामुख्याने वाहत्या प्रवाहामधील अडथळे दूर करण्यास प्राधान्य देण्यात येते. यावर्षी नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम मोठया प्रमाणात करण्यात येत असून त्यामुळे पावसाळी कालावधीत अडचण होणार नाही असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.    या पाहणी दौऱ्यांमध्ये आयुक्तांसमवेत अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त श्री.संजय शिंदे, उदयान उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे तसेच संबंधित विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.     सकाळी 8 वाजता घणसोली – ऐरोली खाडीवरील पामबीच संलग्न ब्रीजच्या कामापासून पाहणी दौऱ्यास सुरुवात करताना त्या ठिकाणी बनवायच्या 89 पिअर्सपैकी 44 पिअर्सचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पिअर्सचे फाऊन्डेशनपर्यंत आलेले काम जून अखेरीस पिअर कॅपपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे पावसाळी कालावधीत स्पाईन, विंग व गर्डर कास्टींगचे काम पूर्ण करावे अशाही सूचना देण्यात आल्या. गर्डर लाँचिंगचे काम सुरु झाले की मध्ये थांबवू नये असे स्पष्ट निर्देश देत करायच्या कामाचे दिनांकनिहाय नियोजन करा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करा असेही निर्देश आयुक्तांनी दिले.    तळवली नाका येथे प्रवेशव्दाराजवळ चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणाला भेट देत नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आयआयटी तज्ज्ञांची मदत घेऊन आराखडा तयार करावा व त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडते हे लक्षात घेत त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असेही निर्देश देण्यात आले.      कोपरी स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी स्नानगृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे तसेच अस्थी ठेवण्यासाठी लॉकरची व्यवस्था करण्याचेही आयुक्तांनी सूचित केले.

  नवी मुंबईत ठिकठिकाणी मोठया नाल्यांची सफाई सुरु असून कोपरी गावातील नाला, कोपरी सिग्नल पेट्रोल पंपासमोरील नाला, सेक्टर 29 येथील नाला तसेच सेक्टर 17 वाशी येथील नाला व सेक्टर 11 सानापडा येथील नाल्याची पाहणी करताना खोलवर जाऊन गाळ काढावा व तो थोडासा सुकल्यानंतर लगेच उचलून न्यावा असे आयुक्तांनी सूचित केले. नाल्याच्या कडेला असलेली झाडेझुडपे छाटणी करुन घ्यावीत तसेच कोपरी पेट्रोल पंपासमोरील नाल्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी जाळया लावाव्यात व पुलावरील भिंत उंच करावी असेही आयुक्तांनी सूचित केले. कोपरी गावातील नाला व सेक्टर 17 मध्यवर्ती नाला वाशी यांच्या एका बाजूस कुंपण भिंत आहे तशीच कुंपण भिंत रस्त्याकडील दुसऱ्या बाजूसही उभारावी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.

    नाल्यामधून स्वच्छ पाणी वाहते राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने एमआयडीसी, एमपीसीबी व महानगरपालिका अशा तिन्ही प्राधिकरणांच्या अभियंत्यांनी नाल्याचा उगम होतो तिथून खाडीपर्यंत पाहणी करुन ज्या ठिकाणी नाले दूषित होतात अशा जागी छोटे मलप्रक्रिया युनिट उभारुन नाल्यात येणारे पाणी स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी सार्व.आरोग्‍य अभियांत्रिकी विभागाला दिले.

      कोपरी येथील ॲम्युझमेंट पार्कची पाहणी करताना त्यामध्ये अनेक सुधारणा आयुक्तांनी सूचविल्या व त्यामधील कासवाच्या भव्य प्रतिकृतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असे निर्देश दाले. सेक्टर 29 वाशी येथील आयुष्मान आरोग्य मंदीराची पाहणी करताना त्याच्या आसपासचा परिसर सुशोभित करावा असे सूचित करण्यात आले. सेक्टर 7 वाशी येथील अंडरपासचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याच्या दुरुस्तीबाबतची कार्यवाही करावी तसेच वाशीगाव येथील तात्पुरत्या स्वरुपात सुरु असलेल्या भाजी व मासळी मार्केटची पाहणी करताना सुस्थितीतील मार्केट उभारण्यासाठी सिडकोकडून भूखंड घ्यावा असेही आयुक्तांनी सूचित केले.

     पाहणी दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी थांबत शहर स्वच्छतेविषयी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी मौलिक सूचना केल्या.

0000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संकल्प: ‘सेवा पंधरवडा’**सेवा परमो धर्म: जनतेची कामे आता वेगवान..!*

vishwatmaklokswamivarta

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम मतदारांच्या सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष व संपर्क क्रमांकांची घोषणा

एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा- अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

vishwatmaklokswamivarta

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार-कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे